शिवसेनेकडून ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा राज ठाकरेकडून पाठिंब्यासाठी भेट घेतली होती. आता निवडणुकीत विजय झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचे त्यात मोठे सहकार्य लाभले. या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी राज यांना भेटलो. दरम्यान, वादात सापडलेल्या निकालावर भाष्य केले. वायकर म्हणाले की, मतमोजणीनंतर अमोल किर्तीकर यांची माफी मागितली. परंतु, विनाकारण मला लक्ष्य करून माझ्या विरोधात नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी देखील विरोधात भूमिका घेतली. मात्र, कामाच्या जोरावर मी विजयी झालो आहे. विरोधकांनी आता जय पराजय मोठेपणाने पचवायला शिकायला हवे, असे आवाहन वायकर यांनी केले. तसेच खासदारकीची शपथ म्हणजे ही काही आई- वडिलांची किंवा देवाची शपथ नाही, असा टोला त्यांनी लगावला. मी अल्कोहोलिक नाही वर्काहोलिक आहे, असा टोला देखील रवींद्र वायकर यांनी लगावला आहे. मशीन हॅक केल्याच्या आरोपावरून ही टीकास्त्र सोडले. मतमोजणी ठिकाणी मोबाईल घेऊन केल्याचा मुद्दाही त्यांनी खोडून काढताना, मोबाईल टॉवर तपासल्यास अनेकांकडे मोबाईल असल्याचे दिसून येईल. माझ्याविरोधात सुरू असलेला खोटा प्रचार थांबवा, असा इशाराही वायकर यांनी दिला.
-----------