मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान

Santosh Gaikwad April 14, 2024 06:51 PM

मुंबई दि. १४ : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून पूर्वीपेक्षा अनेक बहुमजली इमारती शहरात निर्माण होत आहेत. अनेक देशात अग्निशमन कार्यात ड्रोन तंत्रज्ञान वापरले जाते, तसेच आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान आपल्या अग्निशमन दलांनी देखील अंगिकारण्याबाबत विचार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल  रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला,  मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिका-यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले  त्यावेळी ते बोलत होते.

            महानगरांमध्ये आगीबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे, तसेच सर्व हाऊसिंग सोसायटी व औद्योगिक आस्थापनांचे नियमित फायर ऑडिट करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.    

            आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असून वाहनांच्या आगीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यंदा अग्निशमन सेवेकरिता राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या मुंबई अग्निशमन दलातील ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते यावेळी पदक प्रदान करण्यात आले.

      मुंबई अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी संपत कारंडे, लिडिंग फायरमन दत्तात्रय पाटील, सहायक फायरमन गुरुप्रसाद सावंत तसेच चालक ऑपरेटर संदीप गवळी यांना राज्यपालांनी पदक प्रदान केले.  राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांचे स्वागत केले तसेच त्यांच्या पोशाखाला अग्निशमन ध्वजाचे तिकीट लावले.

            मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील विविध शहरे व आस्थापनांचे मुख्य अग्निशमन अधिकारी यावेळी उपस्थित होते.सन १९४४ साली मुंबई डॉकयार्ड येथे जहाजाच्या स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो.

0000