ग्रँट रोड येथील इमारतीचा काही भाग कोसळला
Santosh Gaikwad
July 20, 2024 04:02 PM
मुंबई : ग्रँट रोड येथे एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचावकार्य सुरु झाले होते. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळेच इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरु झाली की, अशा इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना आज ग्रॅण्ड रोड परीसरात घडली. ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वेस्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत आहे. ही म्हाडाची इमारत आहे. या इमारतीचा तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. अग्निशमाक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत 20 ते 22 नागरिक अडकले आहेत. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं.