युतीत दरार : मुंबई महामार्गावरून मंत्री रवींद्र चव्हाण vs रामदास कदम यांच्यात कलगीतुरा !

Santosh Gaikwad August 20, 2024 11:19 AM


मुंबई-गोवा महामार्गावरून युतीच्या नेत्यांमध्ये जुंपली 

मुंबई  : मुंबई गोवा महामार्गावरून शिंदेच्या  शिवसेनेचे  नेते रामदास कदम आणि भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कलगी तुरा रंगला आहे. दोन्ही नेत्यांनी थेट एकमेकांवर आगपाखड केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कदम - चव्हाण यांच्यामध्ये जुंपल्याने  शिवसेना भाजप मध्ये मोठा वाद होण्याची शक्यता असून हा वाद आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच सोडवावा लागण्याची शक्यता निर्माण झालीय.  

रामदास कदम म्हणाले,   प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपत नाही, याचं दु:ख वाटते. नुसते पाहणी दौरे कशासाठी करता ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविंद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजिनामा घ्यावा, असा घरचा आहेर कदम यांनी दिला. तर रामदास कदम यांच्या वक्तव्यावर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण संतापले आणि युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांच्या नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो , जसं च तसं उत्तर दयायला रवींद्र चव्हाण समर्थ आहे. परंतु मी जर सौजन्य सोडलं तर मी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला तयार आहे. मोठं -मोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही, ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्व देणारे राहिले नाही विसरून जा अशा पद्धतीने कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे आता पुन्हा भाजप आणि शिवसेनेत वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून यावर महायुतीचे वरिष्ठ नेते मध्यस्थी करून वाद कसे सोडवणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.