पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाचा आवाज बनला पाहिजे : संजय आवटे यांचे प्रतिपादन

Santosh Gaikwad January 06, 2024 08:03 PM


मुंबई : सर्वसामान्य माणूस या भारताचा केंद्र बिंदू आहे. हा देश कोणत्याही राजकीय व्यक्तीचा नाही. हा देश तुमचा आणि आमचा आहे. सत्तेवर कोणीही येवो पण सर्वसामान्य माणसाची सत्ता कायम असली पाहिजे. त्यामुळेच  पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाचा आवाज बनून, नवीन विचार मांडणारा समाज घडवला पाहिजे  असे प्रतिपादन पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या पुरस्कार सोहळयात केले. 


याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि वाबळे, विश्वस्त राही भिडे, सचिव संदीप चव्हाण, उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के, स्वाती घोसाळकर, जगदीश भुवड आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.  


यावेळी बोलताना आवटे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला बळ देऊन सजग करणं हे आव्हान आपल्यापुढं आहे.   नव्या युगात कोणी कितीही  प्रयत्न केले तरी भारताची कल्पना खोडून टाकता येत नाही. कुठलाही नवा विचार बुडविण्याचा प्रयत्न केला जातोच, पण नवा विचार मांडण्याचा प्रयत्न करत राहणं हे फार महत्वाचं काम असतं. व्यवस्थेला वेगळया विचाराची  भिती वाटते, म्हणून दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि  गौरी लंकेशची हत्या  केली जाते.  विचार करणारा समाज घडवणं  हे आपल्यापुढं मोठं आव्हान आहे. व्यवस्थेला वेगळा विचार करणारा समाज नकोय असेही आवटे म्हणाले. 


आतापर्यंत ज्या घटकांना आवाज नव्हता, त्यांना आवाज मिळणार आहे हे जागतिकीकरणाचे महत्वाचे वैशिष्ट आहे. आताच्या माध्यमांचा प्रवास हा गुटेन बर्ग ते जुकेर बर्ग असा आहे. माध्यमांचे आव्हान बदलली आहेत. स्वरूप बदलले आहे. ज्याच्या हातात मोबाईल फेसबूक आहे असा प्रत्येकजण पत्रकार आहे असेही आवटे म्हणाले. 


ज्या देशात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. अंतिम सत्ता जनतेची आहे हे वारंवार सिध्द करून देणारा माणूस आहे. पण माध्यमांनी राजकीय नेत्यांनी आणि उद्योग समूह या तिघांच्या षडयंत्राने हे  आखलेलं आहे. नवी माध्यम आली तेव्हा माध्यमाचं लोकशाहीकरण होईल अस वाटलं होतं, पण आता  लोकशाहीचे माध्यमीकरण झालयं. आज माध्यम व्यवस्था शरण आहेत अस परखड मत आवटे यांनी व्यक्त केलं. 


सध्या संघर्षाच्या कार्यकाळात आपण पत्रकारिता करीत आहेात. आपल्याला डॉ  बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकहितवादी आगरकर बाळशास्त्री जांभेकर असा  वारसा लाभला आहे. आपला वारसा इतका चांगला असताना आरसा वाईट का ? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत आपल्याला पुढं लढावं लागेल असे आवटे म्हणाले. 



या प्रसंगी दि. १ जानेवारी २०२४ रोजी सक्रिय पत्रकारितेत ५१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल व ‘सामना’ या राजकीय मुखपत्रावर पी. एचडी. करुन डॉक्टरेट मिळविल्याबद्दल दै. प्रहारचे संपादक श्री. सुकृत खांडेकर यांचा आवटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू व आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


 हे पुरस्काराचे मानकरी ....


यावेळी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार अल्पेश करकरे, दिनेश मराठे यांना विभागून देण्यात आला. जयहिंद प्रकाशन पुरस्कार दिवाकर शेजवळकर, कॉ तु कृ सरमळकर पुरस्कार देवेंद्र भगत, विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार नितीन सप्रे, रमेश भोगटे पुरस्कार उदय जाधव शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार संजीव भागवत यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ५० वर्षे झालेल्या संघाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. तर सदानंद खोपकर  लिखीत अमृतकुंभ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचलन राजेंद्र हुंजे यांनी तर आभार स्वाती घोसाळकर यांनी मानले. 

 -------------