मुंबईतील पहिली मेट्रो नवीन वर्षात धावणार ! ; अश्विनी भिडे यांची माहिती
Santosh Gaikwad
December 29, 2023 10:41 AM
मुंबई : मेट्रो ३ चे काम अंतिम टप्प्यात आले असून, जानेवारी अखेरपर्यंत डेपो कनेक्टीव्हिटीचे काम ही पूर्णत्वास येणार आहे. त्यानंतर दोन ते तीन महिन्यात मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर अश्विनी भिडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्याख्यानमालेत दिली. त्यामुळे मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो नवीन वर्षातच धावणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी ज्येष्ठ पत्रकार आप्पा पेंडसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानात प्रामुख्याने मुंबईच्या नागरी प्रश्नांना प्राधान्य दिले जाते. यावर्षी ‘मुंबईतील मेट्रोची सद्यस्थिती आणि भविष्यातील मेट्रोचे लोकांना होणारे फायदे ’ या विषयावर व्याख्यानमाला पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, वैजयंती कुलकर्णी आपटे आदी उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि वाबळे यांच्या हस्ते अश्विनी भिडे यांचा शाल, श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
मेट्रो ३ मार्गिकेची जबाबदारी ‘एमएमआरसी’वर आहे. अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प मार्गी लागत आहे. भिडे म्हणाल्या, मुंबईतील पूर्णत: भुयारी असलेली मेट्रो ३ मार्गिका पूर्णत्वास नेणे हे आर्थिक, तांत्रिकदृष्टय़ा मोठे आव्हान होते. ती सर्व आव्हाने पेलत आता हे काम पूर्णत्वास आले आहे. मुंबईत खासगी वाहनांची संख्या १४ लाख असून तिन्ही बाजूला समुद्र विस्तारलेला असल्याने अनेक अडचणी आहेत. रेल्वे आणि बसवर क्षमतेपेक्षा अधिक ताण पडत आहे. मेट्रोमुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. मेट्रो ३ ची ३३.५ किमीची मार्गिका आहे. सुमारे ३७ हजार २७६ कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केंद्र राज्य सरकारकडून अनुदान मिळाले असून जायका या कंपनीकडून ५७ टक्के कर्ज उभारणी केल्याचेही भिडे यांनी सांगितले. आठ डब्ब्यांची ही गाडी असून २४०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणार आहे तसेच सर्व प्रकारची कामे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाययाने केल्याचेही त्यांनी सांगितले.
भुयारी मार्गात एकूण २६ स्टेशन्स असून, १९ स्टेशन्स रस्त्यावर खड्डा खोदून बांधण्यात आली. विशेष म्हणजे वाहतूक व्यवस्था सुरू ठेवून कामे करण्यात आली. यासाठी सुमारे १२ किमी चे रस्ते खोदण्यात आली. त्यातील अडीच किमीचे रस्ते व्यवस्थित करण्यात आले असून ९.५ किमी रस्ते शिल्लक आहेत. येत्या जूर्लपर्यंत हे सर्व रस्ते पूर्ववत होतील असेही त्यांनी सांगितले. मेट्रो ३ च्या प्रकल्प साकारताना सुमारे ७५ हेक्टर जमीन संपादन केली. त्यातील ७३ हेक्टर जागा हि शासकीय होती तर अडीच हेक्टर हि खासगी होती. अनेक ठिकाणी झोपडपट्टया होत्या. त्यातील रहिवाशांचे पूर्नवसन करण्यात आले.
या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी सांगताना भिडे म्हणाल्या की, सिव्हिलचे कामे ९७ टक्के स्टेशनची कामे ९३.७ टक्के तर टनेलची कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. स्टेशन्स टनेलची कामे पूर्ण झाली असून डेपो कनेक्टिव्हिटीची कामे सुरू आहेत. जानेवारी अखेरपर्यंत डेपोमधून ट्रेन टनेलमध्ये आणणे शक्य होईल असेही त्यांनी सांगितले. भुयारी रेल्वे असल्याने प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थी महिला अंध दिव्यांग या सगळयांचा विचार करूनच बांधणी करण्यात आली आहे. लिफट, एस्केलेटर दिव्यांग प्लॅटफॉर्म, दरवाजे व्हिलचेअर ठेवण्याची जागा, अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपी आदी सोयी आहेत. त्यामुळे मेट्रोचा प्रवास हा सगळयात सुरक्षित आहे असे त्यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्पात २८०० झाडे स्टेशनसाठी तर २१४१ झाडे डेपोसाठी काढण्यात आली मात्र तेवढीत झाडे वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्प कारशेडचा कोर्टात अडकल्याने तीन वर्षे विलंबामुळे ४ ते ५ हजार केाटीचा खर्च वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
पावसाळयात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते त्यामुळे भुयारी मार्गात पावसाळयात पाणी साचू शकेल का यावर बोलताना त्या म्हणाल्या की, पावसाचा कोणताही परिणाम होणार नाही अशा पध्दतीने बांधणी करण्यात आली आहे. या सगळयाच्या अगोदर अभ्यास करण्यात आला. गेल्या दोन अडीच वर्षापासून काम सुरू आहे पण पावसाळयात कुठेही पाणी साचले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी आत जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईत अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मेट्रोमुळेच वाहतूक कोंडी होते असे म्हणता येणार नाही. वाहतूक सुरू ठेवून मेट्रोची कामे सुरू आहेत. मुंबईत वाहनांची संख्या १२५ टक्के वाढल्याचेही भिडे यांनी सांगितले. जमिनी संपादनापासून ते प्रकल्प उभारणीपर्यंतची सर्व माहिती, त्यातील अडचणी, त्यातून काढलेला मार्ग या सगळयांची माहिती भिडे यांनी प्रेझेंन्टेशनद्वारे दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर केले .
------