मुंबई, दि. ९ः मुंबई उपनगरातील करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स, चर्नी रोड आणि हार्बर रेल्वेमार्गावरील कॉटन ग्रीन, डॉकयार्ड आणि किंग्ज सर्कल या सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मंगळवारी बहुमताने विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. हा ठराव केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवणार असून त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर नामांतरणाचा मार्ग खुला होईल.
मुंबई लोकलच्या रेल्वे स्थानकांना असलेली ब्रिटिशकालीन ओळख पुसून नवी नावे द्यावीत, अशी मागणी शिवसेनेने केली होती. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत त्याला तत्त्वतः मान्यता दिली. पारतंत्र्याच्या खुणा पुसून महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता टिकवणे, मराठी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, असे त्यावेळी स्पष्ट सांगण्यात आले होते. अखेर विधान परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी सात स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मांडला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तो विधान परिषदेच्या सभागृहासमोर मांडून एकमताने मंजूर केला. आता केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर सात स्थानकांची नावे बदलण्याची अंमलबजावणी सुरू होईल.