ठाकरे गटाकडून पालिका अधिका-याला मारहाण
Santosh Gaikwad
June 26, 2023 06:54 PM
मुंबई : वांद्रे येथील ठाकरे गटाची शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून पालिकेने शाखेवर हातोडा मारला. मात्र शाखेवरील कारवाई दरम्यान बाळासाहेबांचा फोटो न काढू दिल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीएमसी अधिकाऱ्याला चोप दिला आहे.
वांद्रे येथे ठाकरे याचं निवासस्थान मातोश्री आहे. या वांद्रेमध्ये ठाकरे गटाची एक शाखा होती. ही शाखा अनधिकृत आहे, असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तोडक कारवाई करताना विरोध केला नाही. मात्र शाखेत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा तरी काढू द्या, अशी विनंती या शिवसैनिकांनी केली. पण पालिका कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पालिका अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो असलेली शाखाच तोडून टाकली. त्यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच चिडले. त्यामुळं चिडलेल्या शिवसैनिकांनी पालिकेत जाऊन थेट संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केली. दरम्यान, अधिकारी मारहाण प्रकरणी वाकोला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ज्या अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला जाणार आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.