मुंबई : कर्नाटकमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसने ऐतिहासीक विजय मिळवल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रीत लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे त्यामुळें आता भाजपविरोधातील मविआची वज्रमुठ अधिकच घट्ट झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी रविवारी मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा होऊन पुढील दिशा ठरविण्यात आली.
भाजपचा कर्नाटकमध्ये मोठा पराभव झाला असूनए पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जनतेने नाकारल्याचे मतपेटीतून स्पष्ट झाले आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही उत्साह संचारला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी विरेाधकांची एकजूट झाली असून त्या दृष्टीने निवडणुकाही एकत्र लढविण्यावर एकमत झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसच नव्हे तर देशातील विरोधी पक्ष जिंकला आहे महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होऊन कर्नाटकची पुनरावृत्ती होईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.