“१६ आमदार अपात्र ठरवण्याचा माझा निर्णय न्यायदेवता मान्य करेल.” नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला विश्वास
Santosh Sakpal
May 10, 2023 08:06 PM
MUMBAI : नरहरी झिरवळ म्हणाले मी दिलेला निर्णय कुठल्याही आकसातून घेतला नव्हता. तोच निर्णय कायम राहिल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागणार आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीच यासंबंधीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचे सरकार कोसळणार की राहणार या कळीच्या प्रश्नाचं उत्तरही गुरुवारी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मी दिलेला निकाल कायम राहिल असा विश्वास झिरवळ यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हटलं आहे नरहरी झिरवळ यांनी?
मी जेव्हा १६ आमदारांना अपात्र केलं ते काही कुठल्याही आकसापोटी किंवा कुठल्याही अन्य कारणापोटी केलं नव्हतं. जे काही कायद्याच्या चौकटीत होतं त्या नियमानुसार मी त्यांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की न्यायदेवता मी दिलेला निर्णय मान्य करेल.
१६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तो चूक की बरोबर हे कोर्टाने ठरवलं असेल तर आत्ताचाही निर्णय माझ्याकडेच सर्वोच्च न्यायालय देईल असंही झिरवळ यांनी म्हटलं आहे. घटनेला धरूनच मी निर्णय दिला आहे. माझा आत्मविश्वास मला हे पक्कं सांगतो आहे की मी दिलेला निर्णय मान्य केला जाईल.
येणारा निर्णय ऐतिहासिक असणार आहे. समजा हे १६ आमदार अपात्र झाले नाहीत तर कुणीही उठेल आणि बाजूला जाऊन स्वतंत्र गट स्थापन करेल. देशात हे उदाहरण दिलं जाईल असंही झिरवळ यांनी म्हटलं आहे. लोकांमध्ये असं वातावरण आहे की सत्तासंघर्षाचा निकाल लागला पाहिजे. एकीकडे राज्यातला शेतकरी पिचला आहे, त्याला मदतीची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीसाठी हा निकाल महत्त्वाचा असणार आहे असंही झिरवळ यांनी म्हटलं आहे.
जनतेसाठी आणि घटनेचं जे काही महत्त्व आहे त्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. काय निर्णय येतो ते बघू. त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून आम्ही काय तो निर्णय घेऊ. सध्या तरी काही हालचाली नाहीत असंही झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.
Santosh Sakpal
November 17, 2024
Santosh Sakpal
November 12, 2024
Santosh Sakpal
November 06, 2024
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023