लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा :- नाना पटोलेंचे आवाहन !
Santosh Gaikwad
August 17, 2023 06:25 PM
काँग्रेस जिल्हाध्यक्ष, विभाग, सेल, आघाडी व संघटनांची संयुक्त बैठक संपन्न
मुंबई, दि. १७ ऑगस्ट : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे. लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या सर्व मतदारसंघात काँग्रेसचे संघटन, सेल, विभाग, फ्रंटल ऑर्गनाझेशन, या सर्व घटकांनी पूर्ण ताकदीने काम करावे. प्रत्येक जागा जिंकण्याचा निर्धार करूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विविध विभाग, सेल, आघाडी व संघटनांचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, समाजातील सर्व जाती, धर्माचे घटक व व्यवसायिकांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी ३९ सेल स्थापन केले आहेत. हे सर्व सेल तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करतील. काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत आहे, लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास आणखी दृढ होत आहे, जनतेला परिवर्तन हवे आहे. जनतेपर्यंत पोहचा व काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार करून काम करा. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे, भ्रष्ट, अन्यायी, अत्याचारी भाजपा सरकारला सत्तेतून उखडून टाकणे हेच काँग्रेसचे मुख्य ध्येय आहे.
पत्रकाराचा प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई करुन त्याचा आवाज दडपण्याचे काम भाजपा करत आहे. नागपूरचे वकील सतीश उके यांना मोक्का लावण्याचे काहीच कारण नाही. परंतु सत्तेचा दुरुपयोग सुरु असून त्याच भूमिकेतून ही कारवाई करण्यात आलेली आहे. सतिश उके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतित्रापत्रात काही महत्वाची माहिती दिली नाही अशी तक्रार केलेली आहे, यावरून त्यांच्यावर खोटे आरोप लावून मोक्का लावण्यात आला आहे. हा सत्तेचा माज असून जनता भाजपाचा सत्तेचा हा माज उतरवेल.
टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकीला माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, आ. सुरेश वरपुडकर, आ. अभिजित वंजारी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.