मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्मा घातामुळे झालेल्या १३ श्रीसेवकांचा मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट द्वारे केली आहे. यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
नवी मुंबई खारघर येथील मैदानावर आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ निरुपणकार आप्पाासाहेब अधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या सोहळ्यात लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. भर उन्हात हा कार्यक्रम झाल्याने उन्हाच्या त्रासाने १३ श्री सेवकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याने त्यांना कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दुर्घटनेत निष्पाप लोकांचा जीव गेल्याने सर्वच स्थरातून सरकारला दोषी धरण्यात येत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यसरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे.महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे झालाय का ? खोके सरकार नक्की काय लपवतंय? असा सवाल ट्वीट द्वारे उपस्थित केलाय.