नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधानपदाची हॅट्रीक साधणार

Santosh Gaikwad June 07, 2024 09:54 PM


नवी दिल्ली : देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी रविवार दि ९ जूनला संध्याकाळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होण्याची शक्यता आहे. रालोआच्या सर्व घटक पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सादर केला.  यावेळी रालोआच्या सर्व घटक पक्षांचं पाठिंब्याचं पत्र मोदी यांनी राष्ट्रपतींना दिलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनासमोर माध्यमांशी संवाद साधला. 

देशाच्या अमृतमहोत्सवानंतरचं हे सरकार असणार आहे. सलग तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले.  अठराव्या लोकसभेत नवी ऊर्जा आणि युवा चेहरे आहेत, असं सांगत गेल्या २ कार्यकाळांपेक्षाही अधिक गतीनं हे सरकार काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  समाजाच्या सर्व क्षेत्रात होत असलेलं परिवर्तन भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. देशबांधवांच्या वाढत्या आशा-आकांक्षा  पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गेल्या 10 वर्षात आम्ही खूप चांगलं काम केलंय. देशभरात आणि जगातील अनेक संकटांना आपण सामोरं गेलोय. जगात भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत आहे. अर्थव्यवस्था अधिक बळकच होत आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचं पत्र दिलं आहे. तसेच त्यांनी मंत्र्यांची यादी देखील मागवली आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. त्याआधी एनडीएच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडला आणि एनडीएच्या खासदारांनी त्याला अनुमोदन दिलं. त्यानंतर नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची यादी राष्ट्रपतींना सादर करण्यात आली आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर जोशी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. NDA आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते, तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, मोदी दुपारी आधी अडवाणी आणि त्यानंतर जोशींच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. राष्ट्रपतींना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी मोदींनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली.