दिवंगत नाट्य दिग्दर्शक अजित भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ "विघ्नहर्ता"ची पुढील वर्षापासून नाट्य भूषण पुरस्काराची घोषणा!

Santosh Sakpal April 30, 2023 08:45 PM

    मुंबई : मुंबईत अलिकडेच निवर्तलेले,हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे प्रतिथयश दिग्दर्शक अजित भगत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी"श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान"च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत अनेक लेखक,निर्माते,रंगकर्मींनी नाट्य चळवळीतील एक ध्येयवादी दिग्दर्शक हरपला, अशी भावांजली वाहिली आहे. 

    श्री.विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मोरे यांनी हौशी-प्रायोगिक रंगभूमीवर लक्षणिय कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मीचा पुढील वर्षापासून अजित भगत यांच्या नावे नाट्य भूषण पुरस्काराने गुणगौरव करण्यात येऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.

   परेलच्या दामोदर नाट्य सभागृहा शेजारील सहकारी मनोरंजन मंडळाच्या वास्तूत शुक्रवारी हौशी आणि प्रायोगिक तसेच व्यवसायिक  रंगभूमीवर यशस्वी लिलया पेलणारे दिवंगत ज्येष्ठ दिग्दर्शक अजित भगत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते .

   दत्ता मोरे म्हणाले, अजित भगत यांनी कसदारपणे  दिग्दर्शित केलेल्या  'विघ्नहर्ता'च्या तिन्ही नाटकांना मुंबई विभागून प्रथम क्रमांक मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने संस्थेची तसेच हौशी रंगभूमीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

    नाटककार आणि रंगकर्मी अवधूत भिसे म्हणाले,कोणत्याही नाट्य संहितेची पटकथा अजित भगत यांच्या डोक्यात आगोदरच अचूकपणे फिट झाल्याने ती कलाकृती पुढे यशस्वी ठरली आहे.कथा लेखक काशिनाथ माटल म्हणाले, अजित भगत यांनी हौशी रंगभूमीवरील अनेक नाटके कुशलतेने प्रायोगिक रंगभूमीवर यशस्वी केली.त्यांच्या निधनाने हौशी व प्रयोगीक रंगभूमीचा दूवा कायमचा निखळून पडला आहे. स्तंभ लेखन करणा-या  तन्मयी बेहरे म्हणाल्या,अजित भगत यांनी समर्पित भावनेने नाट्यक्षेत्रात काम केलेय, म्हणूनच ते आजरामर ठरलेयत.

   सर्वश्री अभय पैर, नंदू सावंत,मकरंद पाध्ये,अमन दळवी,भालचंद्र गोरीवले, आदित्य गुजर, निलेश भेरे शंतनू मोरे, सु.बा.सरपडवळ,संतोष चव्हाण,राजश्री पोतदार इत्यादी रंगकर्मींनी अजित भगत यांच्या नाट्य क्षेत्रातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला.लेखक महेंद्र कुरघोडे यांनी सूत्रसंचालन केले तर रंगकर्मी राज जैतपाल यांनी आभार मानले.