बाप लेकीची वेगळी दिशा, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार ?
Santosh Gaikwad
April 07, 2024 06:23 PM
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होण्याची चर्चा रंगली असतानाच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आपण कायमच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केलय. त्यामुळे खडसे बाप लेकीच्या राजकारणाची दिशा वेगळी असल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये भाजप नेतृत्वावर आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंची भाजपात घरवापसी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर भाजपात परतण्याचा मार्ग मोकळा झाला. एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपत परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांची लेक रोहिणी खडसे यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र याबाबत ट्वीट करत रोहिणी खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार, त्या शरदचंद्र पवारांसोबतच राहणार आहेत.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे ..
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेचे अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एक्सवर (ट्विटरवर) एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, स्वत: तुतारी वाजवत असल्याचा फोटो रोहिणी खडसे यांनी ट्वीट केला आहे. तसेच, ”लढ़ेंगे और जीतेंगे. मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी शरदचंद्र पवार साहेबांसोबतच”, असे रोहिणी खडसे यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.