मुंबई : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की,
सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे.
सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे.
खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे असे ते ट्विट मध्ये म्हणाले आहेत.
---