राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा आज निकाल
Santosh Gaikwad
February 15, 2024 12:11 PM
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर त्यांचा निर्णय जाहीर करतील. राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार निकाल जाहीर करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी फूट पडली होती. अजित पवार आणि त्यांचे समर्थक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यास सांगितलं होतं. राहुल नार्वेकर यांनी ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी होत असतानाच सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर करण्यास मुदतवाढ मागितली होती. सुप्रीम कोर्टानं १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुदतवाढ दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटला त्यावेळी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील हे शरद पवारांसोबत होते. तर,व्हीप अनिल पाटील हे अजित पवारांसोबत होते.केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलेलं आहे. त्यामुळं राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधेल आहे.