नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही : राहुल गांधींचा आक्षेप
Santosh Gaikwad
May 21, 2023 09:57 PM
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. आता याच मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. मात्र यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करीत ‘नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नव्याने बांधलेल्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत बिर्ला यांनी पंतप्रधानांना त्याचे उद्घाटन करण्याचा आग्रह केला. मात्र राहुल गांधींनी सोशल मीडियावर केलेल्या आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही. अशी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी २८ मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी स्वातंत्रयवीर वि.दा. सावरकर यांची जयंती आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसने हा राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
असं आहे नवीन संसद भवन ..
लोकसभा सचिवालयाने संसद भवनावर तयार केलेल्या पुस्तिकेनुसार, नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या चेंबरमध्ये ८८८ सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल आणि ३८४ सदस्य राज्यसभेत बसू शकतील. तसेच संयुक्त अधिवेशनादरम्यान सभागृहात १,२७२ सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. पंतप्रधान मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेली ही इमारत पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तिचे बांधकाम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले. त्यानंतर अवघ्या 28 महिन्यांतच ही इमारत पूर्ण झाली. संसदेची नवी इमारत जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस फूट मोठी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 तारखेला 862 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
संसदेची जुनी इमारत ४७ हजार ५०० चौरस मीटरमध्ये, तर नवी इमारत ६४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे. म्हणजेच नवीन इमारत जुन्या इमारतीपेक्षा १७ हजार चौरस मीटर मोठी आहे. नवे संसद भवन ४ मजली आहे. त्याला ३ दरवाजे आहेत, त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार व कर्म द्वार अशी नावे आहेत. खासदार व व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. इमारतीवर भूकंपाचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याची रचना एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग व मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. त्याचे शिल्पकार बिमल पटेल आहेत.