आम्ही चुकलो! विठ्ठला सांभाळून घे; अजितदादांसह नऊ मंत्र्यांची शरद पवारांकडे क्षमायाचना

Santosh Sakpal July 16, 2023 06:29 PM

मुंबई ¡ राष्ट्रवादीचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या गटाने सुमारे १४ दिवसानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली. इतकेच नव्हे तर काही आमदार मंत्र्यांनी शरद पवारांसमोर गुडघे टेकून माफी मागितली.  त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवार यांना पूर्वकल्पना न देता, त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट न घेता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट घेतली. पुढे सुमारे तासभर ही भेट झाली. या नेत्यांनी शरद पवार यांची माफी मागितली असून “आम्ही चुकलो” असे म्हटले आहे. मात्र  शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केले नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले.

पक्ष एकसंध राहावा यासाठी प्रयत्न

शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली. तसेच राषट्रवादी पक्ष एकसंध राहावा यासाठी शरद पवार यांनी आमच्याबरोबर येण्याची त्यांना विनंती करण्यात आली, असे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

भेट घेणाऱ्यांमध्ये यांचा समावेश

हसन मुश्रीफ, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या या नेत्यांचा शरद पवार यांंची भेट घेतलेल्यांमध्ये समावेश होता.

विठ्ठला आम्हाला सांभाळून घे!

शरद पवार हे छगन भुजबळ यांना विठ्ठलासारखे आहेत. राष्ट्रवादीत दुही झाल्यानंतर त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनाला बडव्यांंचा अडसर निर्माण होतो,  असेही म्हटले होते. आज शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी “विठ्ठला आम्हाला सांभाळून घे” अशी आर्त साद घातली आहे.

 

आम्ही भूमिकेवर ठाम

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेला एक गट शरद पवार यांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली. मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर  मला सुप्रिया सुळेंनी फोन करून बोलावन घेतले. म्हणून मी वाय. बी. सेंटरला तातडीने दाखल झालो, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

या आमदारांनी शरद पवार यांना भेटणे अनपेक्षित घटना आहे. त्याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. त्यावर आता भाष्य करणे योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही बसू तेव्हा चर्चा करू, असे जयंत पाटील म्हणाले. ते अचानक भेटले आहेत. त्यातून काय उद्देश आहे, हे आज सांगणे अवघड आहे. पण भेटीला आले याचा आनंद आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खंत व्यक्त केली. तुम्ही मार्गदर्शन करावे असे म्हणाले. गुंता सोडवण्यास सांगितले. पण शरद पवार यांनी काही भाष्य केले नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भेट घेण्यात वावगे काही नाही

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची मला माहिती नाही. मात्र, वर्षानुवर्षे शरद पवार त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे भेट घेतली, तर त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही. यातून काही राजकीय समीकरणे तयार होतील का याची मला कल्पना नाही, असे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.