एनटीसी मिल प्रश्नावर व्यवस्थापनाचे आश्वासन! मात्र सकारात्मक निर्णय नाही घेतला तर मजदूर संघ आंदोलन तिव्र करणार!

Santosh Sakpal April 05, 2023 05:24 PM

  मुंबई : एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत पगारा बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल,साथसाथ गिरण्या पुर्ववत चालविण्या बाबतही प्रयत्न सुरू आहेत,असा विश्वास एनटीसीचे महाव्यवस्था पक(जन) डी.के.नासा यांनी येथे राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे करण्यात आलेल्या कामगारांच्या आंदोलना प्रसंगी बोलताना दिला.

 ‌‌   याच प्रश्नावर गेल्याच महिन्यात मुंबईत आझाद मैदानावर कामगारांचे आक्रोश आंदोलन छेडण्यात आले होते.परंतु केंद्र सरकार आणि एनटीसी व्यावस्थापनाने या प्रश्नावर कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही.या विषयावर कालच संघटना पदाधिकार्यांची परेल मजदूर मंझीलमध्ये अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पडली.या प्रसंगी अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी व्यावस्थापनाला जाग आणण्या साठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता.त्या प्रमाणे आज बेलार्ड पिअर येथील एनटीसीच्या प्रधान कार्यालयावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गिरणी कामगारांचे आंदोलन छेडण्यात आले.खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.त्यात सर्व संघटन सेक्रेटरीनी सहभाग घेतला. 

     एनटीसीच्या टाटा,इंदू मिल क्र५,पोदार आणि दिग्विजय मिलच्या कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला.त्यामध्ये महिला कामगारही मोठ्या संख्येने  सहभागी झाल्या होत्या.वरील चार गिरण्यांसह महाराष्ट्रातील मिळून सहा गिरण्या गेली ३ वर्षे बंद आहेत.राष्ट्रीय मिल मजदूर संघाने न्यायालयात धाव घेतली असता, मागील १०० टक्के पगार देण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.त्या आदेशाचीही अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.कामगारांना जो अर्धा पगार देण्यात येत होता.तोही गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेला नाही.गेल्या तीन वर्षांत जे कामगार सेवानिवृत्त झाले, त्यांची ग्रॅच्युइटी किंवा कोणतीही अन्य देणी देणे बंद केले आहे.या प्रश्नावर संतप्त झालेल्या कामगारांनी आज धरणे आंदोलन छेडून व्यवस्थापनाला जाग आणली आहे.

   येत्या दहा दिवसांत कामगारांच्या थकीत पगारावर निर्णय घेण्यात आला नाही तर,हा प्रश्न संघटनेचे‌ अध्यक्ष सचिन अहिर यांच्या पर्यंत नेला जाईल आणि त्यांच्या अनुमतीने तीव्र आंदोलनाचा निर्णय ‌ घेण्यात येईल,असा आंदोलनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघ पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एनटीसीचे महाव्यवस्थापक डि‌‌.के.नासा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.श्री नासा यांनी आजच हे निवेदन दिल्ली होर्डिंग्ज कंपनीला पाठविण्याचे आश्वासन दिले.निवेदनात गिरण्या त्वरित सुरु करा.थकीत पगार द्या आणि अन्य मागण्याची सोडवणूक करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही तर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल,असे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे.