मुंबई, दि. २४ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा येत्या ५ फेब्रुवारीला अयोध्येला जाण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळासह रामलल्लाचे दर्शन घेतील. आमदार, खासदार आणि तीनही पक्षातील पदाधिकारीअयोध्येला जाऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मित्र पक्षांसह मंत्री आणि मंत्रिमंडळाला आणण्याचे नियोजन भाजपने केले असून त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आल्याचे आल्याचे समजते.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार, खासदारांसह अयोध्येला जाणार असल्याचे यावेळी सांगितले. आता श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी लीग लागली आहे. देश-विदेशातून भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्ठमंडळ अयोध्येला जाणार आहे. त्यानुसार ५ फेब्रवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. एकाच विमानातून संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला पोहोचणार आहे. संपूर्ण मंत्रिमंडळासह शिंदे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. सोबतच शरयु किनारी महाआरती करतील आणि हनुमानगढीचेही दर्शन घेणार असल्याचे समजते.