निवडणूक यंत्रणेवर संशय घेणे हे उध्दव ठाकरे यांचे सततचे रडगाणे - उमेश पाटील

Santosh Gaikwad May 22, 2024 06:26 PM

मुंबई दि. २२ मे - काम करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेवर, निवडणूक यंत्रणेवर संशय घेणे हे उध्दव ठाकरे यांचे सततचे रडगाणे आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मंगळवारी केला.


एकीकडे आरोप करताना उध्दव ठाकरे त्याच निवडणूक प्रक्रियेतून सामोरे जात आहेत आणि दुसरीकडे छातीठोकपणे आमचे एवढे खासदार निवडून येणार मग आपला या यंत्रणेवर विश्वासच नाही तर कशाच्या आधारावर हा आत्मविश्वास आहे. ही यंत्रणा एकतर्फी काम करतेय तर मग तुम्हाला निवडून येण्याची खात्री कुठून आली आहे. महाविकास आघाडीच्या ३० - ३५ जागा येतील हे कशाच्या आधारावर बोलत आहात असे सवाल उमेश पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना केले आहेत.

उध्दव ठाकरे यांचे हे दुटप्पी बोलणे असून सर्वच शहरात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. ऊन्हाचा वाढलेला पारा आणि मतदारांचा निरुत्साह यामुळे मतदान कमी झाले. आता हे कमी का झाले यावर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे याची नोंद घेतली पाहिजे असेही उमेश पाटील म्हणाले.
*****