ठाणे : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याने तेच अंतिम निर्णय घेतील असे सांगून अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सस्पेन्स कायम ठेवत यावर अधिक बोलणे टाळले. शहापूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
शहापुरातील दिवंगत राजकीय नेते दशरथ तिवरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार दौलत दरोडा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी दरोडा यांच्याशी बंद दाराआड जवळपास अर्धातास चर्चा केली. रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या चर्चाबाबत पत्रकरांनी त्यांना छेडले असता पवार यांनी सावध भूमिका घेत अधिक बोलणे टाळले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, शहापूर तालुक्यातील चोंढे, घाटघर ,नगर या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार असून या रस्त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल यावेळी आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव,ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला,किसन तारमळे,ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे,महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारळे,शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, युवा अध्यक्ष सुरज चव्हाण,भाऊ दरोडा, करन दरोडा,आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने अजित पवार गटातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.