संभाजी भिडेंवरून विधानसभेत विरोधक आक्रमक !
Santosh Gaikwad
August 02, 2023 09:17 PM
मुंबई : संभाजी भिडे यांच्या विधानाचे आज विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. महापुरूषांचा अवमान करणा-या भिडेंना जेलमध्ये टाकण्याची मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करताना संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. महापुरूषांचा अवमान करणा-यांची कोणाचीही गय केली जाणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले. मात्र भिडेंप्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याने विधिमंडळात चांगलाच गदारोळ रंगला हेाता.
विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना थोरात यांनी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकारवर सडकून टीका केली. थोरात म्हणाले, ‘राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत, महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. तीन महिन्यात पाच हजार सहाशे मुली बेपत्ता झाल्या आहेत. हुंडाबळी आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये देखील वाढ झालेली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला हे शोभणारे नाही. राज्यातील शहरे हे गुन्हेगारीचे अड्डे बनत चालले आहे. नगर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न मी सभागृहात यापूर्वी उपस्थित केलेला होता. शहरांमधील नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
थोरात यांनी भिडे यांना बेडया घालून जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. थोरात म्हणाले, ‘संभाजी भिडे नामक विकृत इसमाने महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले आणि महापुरुषांचा ज्या भाषेत अपमान केला आहे, ती भाषा सुद्धा सभागृहात मांडणे शक्य नाही. भिडे वारंवार असे बोलतोय आणि सरकार काहीही करायला तयार नाही. याउलट पोलिसांच्या दिमतीत तो फिरतो आहे, याचा अर्थ महापुरुषांच्या बदनामीचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापुरुषांच्या बदनामी वर बोलताना थोरात म्हणाले, ‘इंडिया पोस्ट, इंडिकेटल्स, भारद्वाज स्पिक ही माणसं कोण आहे ? त्यांच्या पाठीमागचा मास्टरमाईंड कोण आहे? हे सरकारने शोधलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्याची यांची हिम्मतच होते कशी? त्यांच्यावर जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्रातल्या जन माणसांमध्ये ही भावना निर्माण होईल की सरकारच्या आशीर्वादाने सर्व सुरू आहे. भिडे सारखा विकृत माणूस वारंवार महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतोय. आणि त्यावर या सभागृहात बोलू सुद्धा दिले जात नाही. खरंतर अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसांना बेड्या घालून जेलमध्ये टाकले पाहिजे. सरकारने या प्रश्नांची उत्तर द्यावीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे हा फ्रॉड माणूस असल्याची टीका केली.
गुरूजी शब्दाला विरोधकांचा आक्षेप
फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी असा केला. त्यातील गुरुजी या शब्दाला विरोधकांनी आक्षेप घेताच फडणवीस यांनी उलटा सवाल केला. संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच भिडे गुरुजींनी महापुरुषांचा अवमान केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसारच वीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी या नियतकालिकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.