भाजप हटाव : लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार, देशातील १५ विरोधी पक्षांचा निर्धार !

Santosh Gaikwad June 23, 2023 06:19 PM


 पाटणा :  भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची महत्वाची बैठक आज बिहार येथील पाटण्यात पार पडली. या बैठकीला देशातील १५  विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी रणनीतीवर चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला. निवडणुकीचा अजेंडा तयार करण्यासाठी  पुढील बैठक 10-12 जुलै रोजी शिमल्यात  होणार आहे. 


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं.  या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल , लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव,  भगवंत मान, एमके स्टॅलिन, मेहबुबा मुफ्ती असे मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रमुख व्यक्तींनी आपली भूमिका मांडली. भाजपमुळे देशाच्या लोकशाही धोका असल्याचा सूर विरोधकांनी लगावला. 


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, "आजची विरोधकांची बैठक चांगली झाली. या बैठकीत सर्वांनी एकत्र चालायचं असं ठरलं आहे. त्याचप्रमाणं सर्वांनी एकत्र निवडणूक लढवायची असंही यामध्ये निश्चित झालं असून यापुढे आणखी एक बैठक होईल. या बैठकीच आयोजन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करतील. या बैठकीत विरोधकांच्या अजेंड्याला अंतिम स्वरुप येईल, सध्या देशात जे सत्ताधारी आहेत ते देशाच्या हिताचं काम करत नाहीएत". सर्व इतिहास बदलू पाहत आहेत. ते स्वातंत्र्याचा इतिहासही बदलून टाकतील, त्यामुळं त्यांना रोखणं गरजेचं आहे, असंही यावेळी नितीशकुमार म्हणाले.


निवडणुकीचा कॉमन अजेंडा  : मल्लिकार्जून खरगे 


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,  कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व विरोधक एकजूट झाले पुढील निवडणुका कशा लढायच्या याबाबत कॉमन अजेंडा बनवण्यात येईल.   ''लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सर्व नेते एकत्रितपणे एक समान अजेंडा तयार करत आहेत. 10-12 जुलै रोजी शिमल्यात आणखी एक बैठक होणार आहे. तिथे बसून अजेंडा तयार केला जाईल. प्रत्येक राज्यात कोणकोणत्या गोष्टी ठरवता येतील, कसे काम करायचे, यावर चर्चा झाली आहे. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे खरगे यांनी सांगितले.  


देशात बदलाची सुरूवात : शरद पवार 


शरद पवार म्हणाले, देशात सांप्रदायिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. आता आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर एकत्र येऊन सामना करायला हवा.  व्यापक देशासाठी आपापसातील मतभेद समस्या हे दूर करत पुढे जाण्याचा निर्णय आम्ही मिळून घेतला आहे मला विश्वास आहे की, पाटण्यातील जी सुरूवात आहे ती देशात बदल आणण्याची सुरूवात आहे असे त्यांनी सांगितल.  जयप्रकाश नारायण यांच्या लढयाच्या आठवणीला त्यांनी यावेळी उजाळा दिला  जयप्रकाश यांच्या नेतृत्वात पाटण्यातून सूरू झालेलं आंदोलन देशात पोहचलं होतं. आता देखील हेच होताना पाहायला मिळेल. 


विचारधारेच्या रक्षाणासाठी एकत्र : राहुल गांधी 


काँग्रेसचे नेते  राहुल गांधी म्हणाले आहेत की,  मोदी हुकूमशाहप्रमाणे देशाचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी प्रयत्नशील आहेात.  भारताच्या मूलभूत विचारांवर आक्रमण केलं जात आहे, भारताच्या मूलभूत संस्थांवर हल्ले केले जात आहेत. ही विचारांची लढाई आहे. आमच्यातही काही मतभेद असतील पण सर्वांना एकत्रित करुन, सर्वांचे विचार घेऊन आम्ही एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे.


पाटण्यातून इतिहास घडेल  : ममता बॅनर्जी 

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाटण्यातून जी आंदोलनं सुरू झाली ती नंतर मोठी झाली हा इतिहास आहे. त्यामुळे ही बैठक दिल्लीत नाही तर पाटण्यात घेण्याचा विचार मी मांडला. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही एकत्रित लढणार आहोत, आम्हीही देशभक्त आहोत, पण भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र येत आहोत. कुणी सरकारच्या विरोधात बोललं तर त्याच्याविरोधात ईडी, सीबीआय लावली जाते. पण देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्यांवर काहीही बोललं जात नाही.  2024 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आलं तर त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत हे नक्की.  भाजपला इतिहास संपवायचा आहे, पण आम्हाला इतिहास सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आम्ही लढत राहू असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. “तीन गोष्टींवर शिक्कामोर्तब झाली. आम्ही एकत्र आहोत. एकत्र लढणार आणि आमची लढाई, आम्हाला विरोधक म्हणू नका. आम्ही सुद्धा नागरीक आहोत. आम्हीसुद्धा देशप्रेमी आहोत. असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.


 गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाही : मेहबुबा मुफ्ती


सर्वजणांनी एकत्र जमणं हे नितीश कुमार यांचं यश आहे. आमच्या जम्मू काश्मीरपासून सुरुवात झाली. आता संपूर्ण देशात हे होत आहे. आम्ही महात्मा गांधी यांच्या विचारांशी हात मिळवले आहेत. अल्पसंख्यांकाना त्रास दिला जातोय. गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाही”, असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.


ही विचारधारेची लढाई : उमर अब्दुल्ला


आजच्या बैठकीचं श्रेय नितीश कुमार यांना जातं. इतक्या लोकांना एकत्र करणं सोपी गोष्ट नाही. इथे कोण नाही ही गोष्ट जास्त महत्त्वाची नाहीय. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व पक्षांनी या बैठकीत सहभाग घेतला आहे. निवडणूक जिंकणं हे आमचं ध्येय नाही. ही विचारधारेची लढाई आहे”, असं उमर अब्दुल्ला म्हणाले. “देशाच्या मुल्यांना वाचवण्याची ही लढाई आहे. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. लोकशाहीला पुन्हा जीवंत करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये बोलताना पाहून बरं वाटलं. पण ते जम्मू काश्मीरमध्ये का येत नाही?”, असा सवाल त्यांनी केला. “जम्मू काश्मीरमध्ये अजूनही राष्ट्रपती राजवट आहे. जम्मू-काश्मीरला पुन्हा निवडणूक व्हायला हवी. या बैठक्या चालत राहाव्या जेणेकरुन पुढच्या चार राज्यांमधील निवडणुका या सेमीफायनल सारख्या आहेत. आपल्याला जिंकायचं आहे”, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.


स्वातंत्र्यावर जो आघात करेल त्याला आम्ही मिळून विरोध : उध्दव ठाकरे 


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की,  प्रत्येकजण जाणतात की, आपण वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. मतभिन्नता असू शकते पण देश एक आहे. देशाची एकता आणि अखंडता वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही देशासाठी एकत्र आलोय. देशात जे हुकूमशाही आणू पाहत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. सुरुवात चांगली झालीय. त्यामुळे पुढचा प्रवासही चांगलाच होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.