मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा
महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज गौरवगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गायनाने करण्यात आली. महानगरपालिकेच्या संगीत अकादमीच्या वाद्यवृंदाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे वाद्य संगीताच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी राज्यपालांनी संगीत अकादमीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.
००००