मुंबईत मतमोजणीसाठी दीड हजार पोलीस तैनात

Santosh Gaikwad June 03, 2024 11:12 PM



मुंबई :   लोकसभा निवडणुकीची  मतमोजणी मंगळवार दि ४ जून रोजी होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी तीन केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.  स्थानिक पातळीवर पोलीस ठाण्यांकडूनही परिसरात गस्त घालण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी राज्य राखीव दलाच्या १२ तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दल, शीघ्रकृती दल, बॉम्बनाशक, तसेच शोधकपथक तैनात करण्यात येणार आहे. शहरांतील विविध ठिकाणी तीन अतिरिक्त पोलीस आयुक्त त्यांच्यासोबत ५ पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एक हजार ५०० अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. त्याचप्रमाणे श्वानपथक, बॉम्ब नाशक पथक, दंगलविरोधी पथक, शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल आदींना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मतमोजणी गोरेगाव येथील नेस्को संकुल हॉल क्रमांक ४, नेस्को हॉल क्रमांक ५, तसेच विक्रोळी पूर्व येथील उदयांचल प्रथमिक शाळा इमारत आणि न्यू शिवडी वेअर हाऊस या ठिकाणी होणार आहे.
 
मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर तेथे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस २४ तास तैनात राहणार आहेत. तसेच साध्या गणवेशातील अनेक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगारांविरोधात महिन्याभरापासून प्रतिबंधात्मक करावाई सुरू आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नेस्को परिसरातील सेवा रस्त्यांवर सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या अवजड वाहनांना मुभा देण्यात आली आहे.