लोकशाहीचे चारही खांब प्रचंड दबावाखाली : कल्याणमधील देखाव्याला पोलिसांची नोटीस !

Santosh Gaikwad September 20, 2023 06:44 PM


कल्याण: कल्याणमधील विजय तरूण मंडळाचा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोकशाहीचे चारही खांब प्रचंड दबावाखाली आहेत. केंद्रातील सरकार म्हणजेच भाजपकडून दबाव टाकला जात आहे. विधीमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर कसा दबाव टाकला जात आहे. हा देखावा कल्याणमध्ये साकारण्यात आला आहे. कल्याणच्या विजय तरूण मंडळातून या देखाव्याला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. विजय साळवी हे या मंडळाचे विश्वस्त असून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत.


 लोकशाहीची होणारी गळचेपी दाखवणारा हा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मागच्या वर्षीही असाच वादग्रस्त देखावा केल्यानं पोलिसांनी तो जप्त केला होता.परंतु न्यायालयाच्या सशर्त परवानगीने तो दाखवण्यात आला होता. 


 याबाबत बोलताना विजय साळवी म्हणाले की, दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयावर सजावट करतो. वर्षभरात घडलेल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर हा देखावा तयार केली जातो. लोकशाहीचे चार खांब आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्यामुळे ते योग्य न्याय देऊ शकत नाहीत. या देखाव्यातून आम्ही असे दाखवलं आहे की, भारतातील लोकशाही ही एका दबाव तंत्रात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. यामध्ये चार खांब दाखवले आहेत. विधीमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे चार खांब कसे दाबले जात आहेत ,ते यातून सांगितलं आहे. सध्या जे भाजपचं सरकार आहे. ते पूर्ण लोकशाही दाबून टाकत आहे. हुकूमशाही पद्धतीनं काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


असा होता मागील वर्षीचा देखावा

या मंडळाने मागच्या वर्षी दाखवलेल्या देखाव्यात शिवसेनेतील बंड होतं. त्यावर पोलिसांनी आक्षेप घेत देखावा जप्त केला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने दिलेल्या सशर्त परवानगीनंतर हा देखावा सर्वसामान्यांना दाखवण्यात आला. या देखाव्यात शिवसेना म्हणून मोठं वृक्ष दाखवण्यात आलं होतं. तर वृक्षाला फळं लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा होता.