पूजा खेडकर प्रकरण, वडीलांनी दोन कोटीची लाच दिली ते मंत्री कोण ?
Santosh Gaikwad
July 17, 2024 08:26 PM
पुणे : बहुचर्चित वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचे वेगवेगळे गैरप्रकार उजेडात येत आहेत. त्यांच्या आई वडीलांवर गंभीर आरोप होत असतानाच या प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे. दिलीप खेडकर यांच्या विरोधातील तक्रारदार तानाजी गंभीरे यांनी याबाबत बड्या नेत्यांवर आरोप केला आहे. पूजा खेडकरच्या वडीलांनी एका मंत्रयाला दोन कोटीची लाच दिली असा आरोप होत आहे त्यामुळे हा मंत्री कोण अशी चर्चा रंगली आहे.
वादग्रस्त ठरलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं राज्यातील प्रशिक्षण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा यांचे पती आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर या प्रकरणातले सहआरोपी आहेत.
दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत. दिलीप खेडेकर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला असताना त्यांना वेगव्ेगळ्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. ते निलंबित होते. त्यानंतरही त्यांना चार्ज देण्यात आला. कुणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय हा अधिकारी इतकं मोठं बेकायदेशीर कृत्य करु शकत नाही, असा दावा गंभीरे यांनी केला.
रामदास कदमांच्या वरदहस्तामुळे दिलीप खेडकरांना पद मिळाल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय. पद देण्यासाठी तत्कालीन मंत्र्याने 2 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तानाजी गंभीरे यांची तीन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. गंभीरे यांनी २०१९ पासून खेडकरांविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली. दिलीप खेडकरांच्या 8-9 कंपन्या असल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय. खेडकर यांच्याकडं 8-10 आलिशान वाहनं आहेत. 14 विविध ठिकाणी जमिनी खेडकर कुटुंबाकडे जमिनी आहेत. या प्रकरणात ACB योग्य रितीनं तपास करत नसल्याचा आरोपही तानाजी गंभीरे यांनी केलाय.
----