मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय १५ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेने जिंकली. उत्तम फटकेबाजीसह अचूक सोंगट्या टिपत प्रसन्न गोळेने प्रारंभी आघाडी घेणाऱ्या युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेचे आव्हान १४-४ असे संपुष्टात आणले आणि विजेतेपदाला गवसणी घातली. सहज विजय मिळवीत निर्णायक फेरीत धडक देणाऱ्या वेदांत राणेला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अविनाश स्पोर्ट्सचे प्रमुख अविनाश नलावडे व श्रीमती नलावडे, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह पुरस्काराने गौरविण्यात आले.
को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने झालेल्या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी व पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे यांनी उपांत्य उपविजेते; नारायण गुरु स्कूलचा उमैर पठाण, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे प्रसाद माने व निधी सावंत यांनी उपांत्यपूर्व उपविजेते; सोहम जाधव, वेदांत लोखंडे, साहिल गुप्ता, केवल कुळकर्णी, देविका जोशी, अमेय जंगम, केतकी मुंडले, नील म्हात्रे यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शालेय ६२ खेळाडूंच्या सहभागाने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सिबीईयू सभागृहात रंगली. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ व ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या सहकार्यामुळे सदर स्पर्धेतील पहिल्या आठ सबज्युनियर कॅरमपटूना राज्य क्रीडा दिनानिमित्तच्या १५ वर्षाखालील सुपर लीग कॅरम चँम्पियनशिप स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे.
***********************************************************