मुंबई : मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांचेसह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या 'क्रांती गाथा' या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकर मध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
सर्वप्रथम राष्ट्रपतींनी राज्यातील तसेच देशातीलआदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत माहिती जाणून घेतली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जनजाती समाजाचे योगदान फार मोठे असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे असा अभिप्राय राष्ट्रपतींनी यावेळी दिला.
स्वातंत्र्यासाठी १८५७ पूर्वी देखील अनेक ठिकाणी छोटे मोठे लढे झाले होते. त्यांविषयी देखील व्यापक संशोधन झाले पाहिजे असे सांगून राजभवनातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला विद्यार्थी व युवकांनी अवश्य भेट दिली पाहिजे असे राष्ट्रपतींनी सांगितले.
यावेळी राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राष्ट्रपतींना राजभवनाच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासाची तसेच क्रांतिकारकांच्या दालनाची माहिती दिली.
ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले 'उत्कल केसरी' डॉ हरेकृष्ण महताब सन १९५५ - १९५६ या कालावधीत मुंबई राज्याचे राज्यपाल होते व ते राजभवन येथे राहिले होते, अशी माहिती त्यांनी राष्ट्रपतींना दिली. ‘क्रांती गाथा’ संग्रहालयात विशेषकरून अज्ञात क्रांतीकारकांची माहिती देण्यात आली असून १८५७ ते १९४६ या काळातील महत्वाच्या घटनांना शिल्प व भित्तीचित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. क्रांतीगाथा संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जून २०२२ मध्ये करण्यात आले होते. पहिल्या महायुद्धापूर्वी बांधण्यात आलेले भूमिगत बंकर सन २०१६ साली प्रकाशात आले होते.
संग्रहालय भेटीनंतर राष्ट्रपतींनी विविध अभ्यागतांच्या व शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या. त्या नंतर राष्ट्रपती शिर्डीला जाण्यासाठी विमानतळाकडे रवाना झाल्या.