भाजपचा दबाव, शिवसेनेच्या या मंत्र्यांना डच्चू मिळणार ? कल्याणातही शिवसेना- भाजपचे जमेना ...

Santosh Gaikwad June 12, 2023 06:03 PM


मुंबई :  एकिकडे कल्याण लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असतानाच, दुसरीकडे शिवसेनेतील पाच  मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याच्या सुचना देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पून्हा एकदा चलबिचल निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्ष कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल, असं मला वाटत नाही. कुणाला मंत्री करायचं, कुणाला नाही ठेवायचं हे, अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे,  दरम्यान येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने त्याच्या तयारीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या सगळयांची चर्चा करण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत शिवसेनेच आमदार काय भूमिका घेतात याकडे लक्ष वेधलय.  

राज्यात  दहा महिन्यांपूर्वी  एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार कोसळलं. आमचीच शिवसेना असा दावा करीत शिंदे गट आणि भाजपने एकत्रीत येऊन सत्ता स्थापन केली. भाजपकडे  १०३ आमदारांची ताकद असतानाही  ४० आमदार असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशा १८  मंत्र्यांनी  शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने  गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छूक आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार करून मुख्यमंत्री शिंदे यांना आमदारांची नाराजी दूर करावी लागणार आहे. त्यातच आता असमाधानकारक काम आणि वादग्रस्त वक्तव्य करणा-या पाच  मंत्र्यांच्या  राजीनाम्या घेण्यासाठी भाजपचा दबाव असल्याने मुख्यमंत्रयांसाठी मोठी डोकेदुखी बनली असल्याचे समजते. 

 राज्यातील सत्ता संघर्षाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने  नुकताच दिला आहे.  १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आला आहे. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आहेत. या निर्णयाची प्रतिक्षा असल्यानेच शिंदे फडणवीस सरकारने अद्यापपर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. आता जूलै महिन्यात पावसाळी अधिवेशन होणार आहे त्या पूर्वीच  मंत्रिमंडळ विस्तार करून आमदारांची नाराजी थोपविण्याच प्रयत्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रयांकडून सुरू असल्याचे समजते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्ली येथे भाजप नेते,  देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भेट घेतली, या भेटी दरम्यान शहा यांनी शिवसेनच्या पाच मंत्रयाविषयी नाराजी व्यक्त करीत त्यांचा राजीनमा घेण्याच्या सुचना केल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलल्या पाहणीत या पाचही या पाच  मंत्र्यांबाबत  समाधानकारक मत  नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे समजते.

आगामी काळात शिवसेनेच्या ५ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला होता.  या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्यामुळे या नेत्यांचा राजीनामा घेण्यास सांगितलं जाणार असल्याचा दावा खडसेंनी केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही  शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू दिला जाणार असल्याचा दावा केला होता. 


शिवसेनेचा दोन वर्धापन दिन

उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे  यांनी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेची सर्वच गणितं बदलून गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो याच शिवसेनेचा येत्या  १९  जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून आधीच करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार देखील या वर्धापन दिनाच्या तयारीला लागले आहेत.  गेल्या वर्षी दसरा मेळावादेखील दोन झाले होते उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा मेळावा हा बीकेसीवर पार पडला होता. ठाकरेंनी यंदाचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव साजरा करायचा असल्याचे आदेश याआधीच आपल्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत त्यामुळे आता दोन्ही बाजूने या वर्धापन दिनाच्या तयारी सुरु झाली आहे. यासाठी एकनाथ शिदे यांनी बैठक बोलावली आहे. 


हे आहेत ते पाच मंत्री ...

शिवसेनेच्या या  मंत्र्यांमध्ये  कृषीमंत्री अब्दूल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड या पाच मंत्रयांची नावे चर्चेत आहेत. असमाधानकारक काम आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्याचे म्हटलं जातय.

 कुणाला मंत्रीपदावरुन काढायचं हा मुख्यमंत्रयांचा अधिकार : चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात माध्यमांनी प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा मी ३२ वर्षांपासून कार्यकर्ता आहे. भाजप पक्ष कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल, असं मला वाटत नाही. कुणाला मंत्री करायचं, कुणाला नाही ठेवायचं हे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत. त्यांच्या पक्षात कुणाला मंत्रीपदावरुन काढायचं हा त्यांचा अधिकार आहे. भाजप कधीच नाक खुपसत नाही. आम्ही त्यांना कशाला सल्ला द्यायचा? आमचं युतीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपचा कोण मंत्री व्हावं, कोण नाही हे भाजप ठरवेल, शिंदे त्यांच्या पक्षाचं ठरवतील”, असं बावनकुळे यांनी सांगितलं. आमच्या आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये धास्ती वाढली पाहिजे, आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी यासाठी कुणीतरी ही गाजराची पुंगी सोडली आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.