प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर !
Santosh Gaikwad
October 25, 2023 07:03 PM
नवी दिल्ली, २५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.
प्रधानमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारास, प्रधानमंत्री मोदी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन करुन मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. तद्नंतर ३.१५ च्या सुमारास, मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायु यांसारख्या क्षेत्रातील सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.
शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन
शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सुविधांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लोक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे .
निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या काठाचे कालव्याचे जाळे देशाला करतील समर्पित
साईबाबांचे दर्शन घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाचे (८५ किमी) कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) १८२ गावांना याचा लाभ होईल. या धरणासाठी सुमारे ५ हजार १७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ चा ८६ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चा प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या योजनेचा महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ होईल.
प्रधानमंत्री .मोदी यांच्या व्यस्त दौऱ्यात ते अहमदनगर शासकीय रूग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी); एनएच (NH) - 166 (पॅकेज-I)च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदि प्रकल्पांचे उद्घाटन तसेच माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणी, आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप करतील.