मुंबई, ता. १७ः प्रो कबड्डीच्या धर्तीवर राज्य सरकार यंदा एक दिवशीय प्रो दहिहंडी स्पर्धा भरवणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत क्रिडा मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मुंबई, ठाणे आणि पालघरमधील दहिहंडी मंडळांच्या समन्वय समितीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. मुंबईतील वरळीच्या एनएससीआय मैदानात ३१ ऑगस्टला खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यामुळे मुंबईत प्रो कबड्डीप्रमाणे मुंबईकरांना यंदा प्रो दहिहंडाचा थरार पहायला मिळणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सुरक्षा हूक, खाली मॅट, वैद्यकीय सेवा आणि विम्याचे संरक्षण कवच गोविंदा मंडळांना दिले जाणार आहे.
मुंबईत दरवर्षी थरांवर थर रचून दहीहंडी फोडण्याचे विक्रम केले जातात. मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-दहीहंडी स्पर्धा भरवावी, अशी मागणी सुरू होती. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहसी खेळाचा दर्जा दिल्याची घोषणा करत, राज्यात प्रो दहिहंडी स्पर्धा भरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता राज्यभरात प्रो दहिहंडी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षिसासाठी क्रिडा विभागाकडून आर्थिक निधीची तरतुदी केली जाईल. त्यासाठी क्रिडा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल. उद्योग विभाग, वित्त विभागाचे मुख्य सचिव, विमा संरक्षण विभागाचे अधिकारी, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील दहीहंडी समन्वय समितीला बैठकीला बोलवण्यात येणार आहे.
मुंबईतील वरळीच्या एनएससीआय मैदानात, येत्या ३१ ऑगस्टला सांयकाळी सात वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत स्पर्धा सुरू राहील. या वेळेत अटी- शर्तीनुसार मंडळांना परवानगी दिली जाईल. विशेषतः १६ मंडळांना यात प्राधान्य असेल. पहिला थर लागल्यानंतर स्पर्धेची वेळ सुरू होईल. तसेच थर लावून यशस्वीरीत्या खाली उतरणारे संघच पुढच्या फेरीत पोहोचतील. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून स्पर्धेसाठी आतापर्यंत १९७ अर्ज आल्याची माहिती, क्रिडा विभागाने दिली.