मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील गडगडी धरण प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद करावी, अन्यथा मंगळवार दिनांक २ जुलै, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे जलआक्रोश मोर्चा व स्वाक्षरी अभियान राबविण्याचा इशारा गडगडी धरण कृती समितीचे अध्यक्ष सीए संतोष घाग यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी समितीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नारायण सावंत, सरचिटणीस आनंद पुरोहित, दत्ताराम घोगले, उपाध्यक्ष विष्णु सनगरे, सेक्रेटरी अरुण गोडे, गिरीश माईन, कोषाध्यक्ष मनोहर घाग आदी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कुळे-वाशी येथील गडगडी धरण प्रकल्पाच्या उभारणीचे काम गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. या प्रकल्पाचा अर्थसंकल्पित खर्च कित्येक पटीने वाढला, तरीही प्रकल्प मात्र पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावावा यासाठी गडगडी धरण कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष घाग म्हणाले की, गडगडी धरण कृती समिती ही पूर्णतः अराजकीय सामाजिक संघटना आहे. गडगडी दशक्रोषीत किंजळे, देवोळे, फणसवळे, कुळे, वाशी, मुचरी, तेर्ये, बोरसुत, सोनवडे, सायले, काटवली, विघ्रवली, ओझरे खुर्द, कोंडओझरे, तळवडे, कोसुंब,सांगवे,किडदाडी,देव धामापूर,मठ धामापूर, कुडवली,पूर ,उमरे ही गावे येतात.
इथल्या गावकऱ्यांचे पाण्यावाचून सुरू असलेले हाल संपावेत, या दृष्टीने समितीच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. या समितीला पाठबळ देण्यासाठी वीस गावांच्या ग्रामपंचायतीकडून एकमुखी ठराव करण्यात आलेला आहे.
१९७२ साली धरणाला मान्यता मिळाली. १९७८ साली बांधकामाला सुरुवात झाली. २०११ साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरणात १३.५ दशलक्षलीटर पाणी साठा क्षमता असताना आता केवळ साडे सहा लिटर दशलक्ष लिटर पाणी साठा असतो. सुरुवातीला धरणाचा खर्च ४ कोटी रुपयांवरून १५० कोटींवर पोहचला. कोकणच्या प्रकल्पाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. मुंबई गोवा महामार्ग अजूनही होऊ शकला नाही मात्र समृध्दी महामार्ग झाला. अशी खंत घाग यांनी व्यक्त केली. गडगडी धरणासाठी वेळ पडली तर जलसमाधी घेऊ असा इशाराही त्यांनी दिला.
विशेषतः या भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष हे फार मोठे संकट आहे. अवर्षण व ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संकट वर्षागणिक भयानक, अक्राळविक्राळ रूप घेत आहे. हा विषय गंभीर आणि जिव्हाळ्याचाच नव्हे, तर जीवनमरणाचाच झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत तसेच प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना संपूर्ण मोबदला मिळावा त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचे घाग यांनी सांगितले.
हा प्रकल्प मार्गी लागल्यास इथल्या गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळणार आहे. लहान-मोठे उद्योगधंदे उभे राहण्यास चालना मिळणार असून, रोजगार-स्वयंरोजगार निर्मिती होईल. शेतकरी-कष्टकरी ग्रामस्थांचा आर्थिक स्तर आणि आर्थिक स्वावलंबन वाढेल, शहरांकडचा ओढा आणि परिणामी शहरांवरचा वाढता ताण कमी होईल, गावे बकाल आणि भकास होण्याऐवजी सुजलाम, सुफलाम होतील आणि एकूणच ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल असे घाग यांनी सांगितले.
*या आहेत मागण्या*
१ रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील तब्बल पाच दशके रखडलेला गडगडी धरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून धरणाचे पाणी कालव्यांऐवजी बंदिस्त पाइपलाइनने लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.
२ विशेष बाब म्हणून केवळ गडगडी धरण प्रकल्पासाठी निधीची तरतूद अधिवेशनात करावी, सदर निधीचा वापर अन्य कोणत्याही प्रकल्पासाठी न करता केवळ गडगडी धरणासाठीच व्हावा.
३ गडगडी धरणाची उंची न वाढवता धरणातील गाळ काढावा.
४ काटवली (निगाडी), (ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) येथील धरणाचे काम पाच वर्षांत सुरुही झालेले नाही, ते लवकरात लवकर सुरु करावे.
५ उमरे (ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी) येथील धरणाला गळती लागलेली आहे त्याचे लवकरात लवकर स्थापत्य परीक्षण करून योग्य ती कार्यवाही करावी व सदर गळती थांबवावी व संभाव्य जीवितहानी टाळावी.
६ गडगडी धरणामुळे किंजळ्यातून विस्थापित झालेल्या आणि सध्या वाशी गावात वस्तीस असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना करावी;
७ माती उपशामुळे अनेक वर्षांपासून वाशी गावात पडलेले जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावेत.
८ धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जॅकवेलसह संपूर्ण प्रकल्पाचे त्वरित सखोल स्थापत्य परीक्षण (Structural Audit) करावे व त्यातील निरीक्षणाच्या आधारे आवश्यक ती कार्यवाही करावी.
९. प्रकल्पग्रस्त शेतकरी-ग्रामस्थांना संपूर्ण मोबदला दिला नसल्यास अथवा त्यांचे समाधानकारक पुनर्वसन झाले नसल्यास ते त्वरित करावे.
१०.अतिवृष्टीच्या वेळी काही भागांमध्ये रहदारीच्या रस्त्यांसह सर्वत्र महापुरासारखे पाणी येते. त्यामुळे शेतीसह जीवितास धोका निर्माण होतो. याबाबतचा अभ्यास करून योग्य उपाययोजना त्वरित करावी. भरतीच्या वेळी धरणातील पाणी सोडणे टाळावे.
------