कोविड काळात महानगरपालिकेने केलेले कार्य जगात अतुलनीय - पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने
Santosh Gaikwad
May 19, 2023 05:00 PM
स्वच्छता कामगार, आशा सेविका, वॉर्डबॉय, नर्स आणि डॉक्टर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी लिखित लढा मुंबईचा कोविडशी' या पुस्तकाचे प्रकाशन ' कोविड काळामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कामगार - कर्मचारी - अधिकाऱ्यांनी अथक आणि अविरत काम करून कोविडशी दिलेला लढा हा जगात अतुलनीय आहे. त्यामुळेच 'मुंबई मॉडेल' म्हणून सुप्रसिद्ध झालेल्या या लढ्याची अत्यंत समर्पक आणि प्रभावी नोंद ओघवत्या शैलीत घेणाऱ्या सुरेश काकाणी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन स्वच्छता कामगार, आशा सेविका, वॉर्ड बॉय, नर्स आणि डॉक्टर यांच्या हस्ते होणे, ही बाब निश्चितच चपखल आणि कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी काढले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (आरोग्य शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉक्टर नीलम अंद्रादे, शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर आणि मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
'लढा मुंबईचा कोविडशी' या पुस्तकाचे प्रकाशन हे प्रचलित पद्धतीने न करता जरा वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. या अंतर्गत ज्यांनी कोविड विरोधातील लढ्यात प्रत्यक्ष भाग घेतलेला, अशांच्या प्रतिनिधींनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. यामध्ये महानगरपालिकेच्या 'सी' विभागात काम करणारे स्वच्छता कामगार संदेश जाधव, जिजामाता नगर मध्ये आशा सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या मनीषा कांबळे, सेवन हिल्स रुग्णालयात 'वॉर्ड बॉय' म्हणून काम करणारे प्रवीण परब, शिव रुग्णालयातील अधिपरिचारिका (नर्स) वैशाली पालये आणि कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
लेखक सुरेश काकाणी यांनी मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या शहरात कोविड विषाणूचा मुकाबला करणे, हे अत्यंत मोठे आव्हान होते. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिवस रात्र एक करून केलेल्या कामांमुळे मुंबईचा कोविड विरोधातील लढा हा यशस्वी झाला असल्याचे सांगतानाच या लढ्याचे श्रेय हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चमूला असून 'लढा मुंबईचा कोविडशी' हे पुस्तक आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण चमूला अर्पण केले असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना पुस्तकाचे लेखक व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा आणि मार्गदर्शनाचा कोविड विषयक नियोजन व व्यवस्थापनात खूप फायदा झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मुंबईच्या कोविड लढायला मोठे बळ मिळाले असे सांगितले.
संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉक्टर नीलम अंद्रादे यांनी आपल्या मनोगतात कोविड काळातील अनुभव नमूद करतानाच . काकाणी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा कसा फायदा झाला, याबद्दल देखील सविस्तर विवेचन केले. लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी कोविड काळातील आपले अनुभव सांगतानाच काकाणी यांचे पुस्तक हे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे, असेच झाले असल्याचे नमूद केले. तसेच 'लढा मुंबईचा कोविडशी' हे पुस्तक त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी कोविड काळात सार्वजनिक आरोग्यवस्थेपुढे उभ्या राहिलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करताना काकाणी यांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा खूप फायदा झाला आणि त्यामुळे कोविड विरोधातील लढा अधिक सशक्त झाल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच कितीही मोठे आव्हान असले किंवा समस्या असली, तरी ती अत्यंत शांतपणे आणि संयमाने हाताळण्याच्या सद्गुण अनुकरणीय असल्याचेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमादरम्यान पुस्तकाचे लेखक सुरेश काकाणी यांची प्रकट मुलाखत वैद्यकीय व्यवसायिक आणि सुप्रसिद्ध सूत्रसंचालक डॉक्टर मृण्मयी भजक यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मृण्मयी भजक यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांची समायोचित भाषणे देखील झाली.
-----
'लढा मुंबईचा कोविडशी' या पुस्तकाबाबत थोडक्यात
'मुंबई फाइट्स बॅक' या सुरेश काकाणी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचे शब्दांकन ज्येष्ठ पत्रकार सुमित्रा डेबराॅय यांनी केले होते. या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते गेल्या वर्षी झाले होते. तर या पुस्तकाचा मराठी अनुवाद वैशाली रोडे यांनी केला असून मराठी पुस्तकामध्ये कालसुसंगत काही अतिरिक्त मजकूर देखील घेण्यात आला आहे.