अनुराधा नेरुरकर, ज्योती कपिले यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार

Santosh sakpal April 07, 2023 01:23 PM



मुंबई : आप्पासाहेब खोत(कोल्हापूर), अनुराधा नेरूरकर (मुंबई), अशोक नामदेव पळवेकर (अमरावती), वसुधा वैद्य (नागपूर), ज्योती कपिले (मुंबई), छाया कोरेगावकर (ठाणे), किरण डोंगरदिवे (बुलढाणा) यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अमरावती येथील मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे ट्रस्ट यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या २०२२ च्या उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर्षी सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक व विचारवंत दा.गो.काळे, शेगाव यांना ‘साहित्यव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध साहित्य प्रकारासाठी राज्यातील साहित्यिकांना सन्मानित करणारी विदर्भातील ही सर्वात मोठी पुरस्कार योजना आहे. 

या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार ठाणे येथील छाया कोरेगावकर यांच्या ‘ रिक्त-विरक्त'या कादंबरीला देण्यात आला आहे, तर उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार कोल्हापूर येथील आप्पासाहेब खोत यांच्या 'काळीज विकल्याची गोष्ट' या कथासंग्रहाला मिळाला आहे. अमरावती येथील डॉ. अशोक पळवेकर यांच्या 'असहमतीचे रंग’ या कवितासंग्रहाला उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी पुरस्कार जाहीर झालाअसून संमिश्र विभागात वैचारिक लेखनासाठी मुंबईच्या अनुराधा नेरूरकर यांच्या ‘विवाहसंस्था-संकल्पना आणि संक्रमण ' या ग्रंथाची निवड झाली आहे. समीक्षा वाड्.मय प्रकारात बुलढाणा येथील किरण डोंगरदिवे यांच्या ‘काव्यप्रदेशातील स्री'या ग्रंथाला पुरस्कार घोषित करण्यात आला आहे; तर बालवाड्.मय प्रकारात नागपूर येथील वसुधा वैद्य यांच्या 'गम्माडी गम्मत व मुंबईच्या ज्योती कपिले यांच्या ‘मदतीचा हात' या बालसाहित्याची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रूपये रोख,शॉल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे .

   माजी राज्यमंत्री व आमदार श्री. प्रवीणभाऊ पोटे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या ट्रस्टच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून मराठी साहित्यातील विविध लेखन प्रकारासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.