रायगड लोकसभेत तिरंगी लढतीमुळे सुनील तटकरेंचं पारडं जड !
Santosh Gaikwad
April 16, 2024 12:04 PM
रायगड : रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अनंत गीते यांना शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. रायगड लोकसभेत सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना रंगणार असतानाच वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. वंचितकडून कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता रायगडमध्ये आता तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रायगडमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सध्या महायुतीकडे पाच आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे एक आमदार आहे. वंचितच्या मतविभाजनचा
फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडमध्ये तटकरेंचे पारडं जड झाल्याची चर्चा रंगली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि अनंत गीते असा सामना मागील दोन लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळाला आहे. त्यामुळे आता २०२४ ला तिस-यांदा लक्षवेधी लढत होत आहे.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना ३ लाख ९४ हजार ६८ तर शिवसेनेच्या अनंत गीतेंना ३ लाख ९६ हजार मते मिळाली हेाती. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही तटकरेंनी गीतेंना जोरदार फाईट दिली होती. २०१४ मध्ये अनंत गीतेंनी सुनील तटकरेंना अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत केले होते. मात्र या पराभवाचा वचपा काढत २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या अनंत गीते यांचा २५ हजार मताधिक्यांनी पराभव केला हेाता.
२०१९ मध्ये सुनील तटकरे यांना ४ लाख ८६ हजार ९६८ तर अनंत गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते पडली हेाती. वंचितच्या सुमन कोळी यांना २३ हजार १९६ मते मिळाली होती. तटकरेंनी गीतेंचा ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला हेाता. तटकरेंना अलिबाग आणि श्रीवर्धन येथून मोठया प्रमाणात लीड मिळाला होता तर गीते पेण, महाड, गुहागर, दापोली येथून आघाडीवर हेाते.
वंचितने कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. कुमुदिनी चव्हाण या उच्चशिक्षित असून त्या महाडमधील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा असून मराठा महासंघाच्या रायगड अध्यक्ष आहेत. त्यांचे पती उद्योजक रविंद्र चव्हाण हे वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची टक्कर सुनील तटकरे आणि अनंत गीते या मातब्बर उमेदवारांशी होणार आहे. मात्र वंचितच्या पारडयात किती मते पडतात हे पाहावे लागणार आहे. वंचितच्या मतविभाजनाचा फायदा तटकरेंना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीची ताकद वाढली
रायगडमध्ये एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर या मतदार संघाचा समावेश आहे. पेणमध्ये भाजपचे रविंद्र पाटील हे आमदार आहेत. अलिबागमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी, महाडमध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले तर दापोलीत शिंदे गटाचे योगेश कदम हे शिंदे गटाचे तीन आमदार आहेत श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तर गुहागरमध्ये भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरेंचे एकमेव आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रायगडमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. रायगड जिल्हयातील शिवसेनेचे २०१९ ला विजयी झालेले तिन्ही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. सध्या महायुतीकडे पाच आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे एक आमदार आहे. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीची ताकद अधिक असल्याचे दिसून येत आहे.