भाजपला पाठींबा देताच मनसे पदाधिका-याच्या राजीनामा

Santosh Gaikwad April 10, 2024 01:49 PM


मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या भूमिकेचे पडसाद मनसेत उमटू लागले आहेत. राज ठाकरेंची भूमिका न पटल्याने मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

अलविदा मनसे असं शीर्षक देत कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.” अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.


पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राज ठाकरे यांनी भाजपा-मोदी-शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजपा- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.


आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राज ठाकरे यांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. पण सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय? असा प्रश्न कीर्तिकुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे 

आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विषय डोळ्यासमोर येतो. पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहे, हे फडणवीसांना मी स्पष्टपणे सांगितलं. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी  मेळ्याव्यात मांडली. 

मनसैनिकांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, सर्व मनसैनिकांना मला एकच सांगायचं आहे की, विधानसभेच्या कामाला लागा. पुढच्या गोष्टी पुढे, पण मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला मांडायचं असेल ते मी मांडेल. उद्या कोणाची पकपक झाली, तर मी माझं तोंड उघडले, असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींना दिला.