महाराष्ट्रात टोल घोटाळा.. फडणवीस धांदात खोटं बोलतायत : राज ठाकरे

Santosh Gaikwad October 09, 2023 01:50 PM


मुंबई :   राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तसेच टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. राज्यात खासगी वाहनांना टोल नसल्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे यांनी फडणवीस धांदात ,खोटं बोलत असल्याचा हल्लाबोल केला.  राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. 


प्रवाशांच्या खासगी दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रविवारी म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत कडाडून हल्ला चढवला. फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला.


टोलनाक्यावर बोलताना राज ठाकरेंनी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीसांच्या आतापर्यंत टोल नाक्यावरील वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप सादर केल्या. यातील एक व्हिडीओ क्लिप फडणवीसांच्या कालच्या वक्तव्याची होती. फडणवीसांचा व्हिडीओ प्ले केल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. "हे खरं आहे? हे तर धादांत खोटं बोलतायत. मग हे पैसे नेमके कुठे जातायत?, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.


दरम्यान राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर पनवेल आणि मुलुंड टोल नाक्यावर मनसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी मनसैनिकांनी वाहनचालकांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा व्हिडीओ दाखवित वाहन चालकांनी टोल भरू नये असे आवाहन केले. यावेळी मनसैनिकांनी टोलनाक्यावरील खासगी दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने टोल न भरता सोडून दिली. त्यामुळे टोलनाक्याच्या मुद्दयावरून मनसे पून्हा आक्रमक झाल्याची दिसून आली. 


फडणवीस यांच्या कार्यालयाकडून माहिती ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टोलमाफीसंदर्भात केलेल्या विधानाविषयी त्यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

१) ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ पथकर स्थानकांवरील व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी १ पथकर स्थानकावरील अशा एकूण १२ पथकर नाक्यांवरील पथकर वसुली बंद करण्यात आली.

२) सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ पथकर स्थानके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ पथकर स्थानकावरील अशा एकूण ५३ पथकर स्थानकांवरील कार, जीप व एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून पथकरातून सूट देण्यात आली आहे.

यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुद्धा २०१७ मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा जीआर सुद्धा ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आला. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.