MENU

......तर हा प्रसंग टाळता आला असता : राज ठाकरे

Santosh Gaikwad April 17, 2023 04:29 PM


मुंबई :  खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान उष्माघातामुळे आतापर्यंत १३ श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रूग्णांना कामोठे येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रूग्णालयात जाऊन श्री सेवकांच्या  प्रकृतीची चौकशी करतानाच मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलं. हा सोहळा राजकीय हेतूने घेतला होता का ? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का ? असा प्रतिसवाल करत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला सुनावले. तर कार्यक्रमाला इतर लोकांना बोलावण्यापेक्षा राजभवनावर बोलावून पुरस्कार दिला असता तर हा प्रसंग टाळता आला असता, असंही ते म्हणाले. 


पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का ? 

राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. सकाळी कार्यक्रम करण्याची गरज नव्हती. वातावरण उन्हाने तापलेलं आहे. स्वत: आप्पासाहेबांना राजभवनावर बोलावून पुरस्कार देता आला असता. आताच्या दिवसात एवढ्या लोकांना बोलावून पुरस्कार देण्याची गरज नव्हती. झाली ती गोष्ट दुर्देवी आहे. कसं कुणाला जबाबदार धरणार कळत नाही. सकाळी न करता संध्याकाळी कार्यक्रम केला असता तर प्रसंग टाळता आला असता, असं राज ठाकरे म्हणाले. या घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे का? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर हे हेतूपूर्वक कोणी केलेलं नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करावा असं मला वाटत नाही असे ठाकरे म्हणाले.