लोकसभा निवडणूक राजू शेट्टींनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट !

Santosh Gaikwad January 02, 2024 06:53 PM


 शेतक-यांच्या प्रश्नासाठी भेट घेतल्याचे राजू शेट्टींचे स्पष्टीकरण 


मुंबई, दि.२: आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षात मोर्चेबांधणी सुरू असतानाच आणि जागा वाटपावरून महाविकास आघाडीत अजूनही तिढा सुटलेला नसतानाच आज शेतकरी कामगार संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. दरम्यान, हातकणंगले  मतदार संघावर शेट्टी यांनी दावा केला. ठाकरेंनी मात्र याबाबत लवकरच घेऊ, अशी  सामंजस्याची  भूमिका मांडल्याचे समजते. मात्र शेतक-यांच्या प्रश्नासाठी हि बैठक झाल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 


राजू शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यातील दुष्काळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा प्रश्न, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. अवकाळी पाऊस, दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत ठाकरे संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नसल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.  


 महायुतीतून शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट एकत्र लढणार आहे. तर महाविकास आघाडीने महायुतीला शह देण्यासाठी व्युहरचना आखत आहे. त्यानुसार जागा वाटपाची गणिते जुळवली जात आहेत. महाविकास आघाडीत वंचितचे प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जागा वाटपावरून आघाडीत वाद रंगला असतानाच राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


सहा जागा लढवणार


लोकसभा निवडणूक कोणत्या ही पक्षासोबत न जाता लढवणार आहे. राज्यात एकूण सहा जागांवर उमेदवार देणार असल्याचे शेट्टी म्हणाले. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास राजू शेट्टी इच्छुक आहेत. धैर्यशील माने येथे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. माने यांना पराभूत करण्याची रणनीती ठाकरेंनी आखली आहे. त्यानुसार तगडा उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.