गोरेगाव आग दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - रामदास आठवले

Santosh Gaikwad October 07, 2023 06:13 PM


मुंबई : गोरेगाव पश्चिमेच्या जय भवानी एसआरए इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू आणि ७० जण जखमी झाल्याची  भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच सर्व एसआरए इमारतीचे स्ट्रक्चरल फायर ऑडिट करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 

 गोरेगावच्या एसआरए इमारतीत सध्या लिफ्ट बंद पडलेली आहे तसेच या इमारतीला पाणी पुरवठा होत नाही. आगीच्या  दुर्घटने नंतर या एसआरए इमारती मधील विविध समस्या उघडकिस आल्या आहेत.अनेक एसआरए इमारतीला ओसी देण्यात आलेली आहे, त्या सर्व इमारतीचे फायर ऑडिट केले गेले नाही. गोरेगाव च्या एसआरए इमारतीत झालेल्या अग्नी तांडवातून शासनाने धडा घ्यावा आणि पुन्हा अशी आग लागण्याची दुर्घटना होऊन जिवितहानी होवू नये. म्हणून सर्व इमारतीचे फायर ऑडिट करावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. गोरेगाव इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाने सांत्वनपर १० लाख रुपयांची मदत केली पाहिजे तसेच जखमींना ही आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.