मुंबई दि.2:महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार,खासदार उघड उघड धमक्या देत आहेत, ते पोलिसांनाही जुमानत नाहीत. घरात घुसून मारू, मशिदीत घुसून मारू अशा उघड धमक्या भाजपाचे खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे देत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे सातत्याने प्रक्षोभक व चिथावणीखोर विधाने करत आहेत. दोन्ही राणेंचे पोलीस सरंक्षण काढून घ्या व त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आय़ुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार विरेंद्र बक्षी, सचिन सावंत, संदीप शुक्ला आणि आदी उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र दिसत असून जाणीवपूर्वक चिथावणीखोर विधाने केली जात आहेत. रामगिरी महाराज यांनीही दोन धर्मात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. देश व राज्य संविधानाच्या मार्गाने चालत असते, त्याला कोणी छेद देत असेल तर त्यांच्यावर करावई केली पाहिजे. माझे बॉस सागर बंगल्यावर राहतात मला कोणी काहीही करु शकत नाही अशा वल्गणा आमदार नितेश राणे यांनी मध्यंतरी केली होती. नितेश राणेंनी सातत्याने प्रक्षोभक विधाने करुनही त्यांच्यावर कारवाई होत नाही यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांना अभय आहे हे स्पष्ट दिसत आहे. पण महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर सामाजिक वातावरण बिघडवून कोणी त्याचा राजकीय लाभ उठवण्याच्या प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
त्याचबरोबर खासदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वे पोलीस आयुक्तांचीही भेट घेऊन धुळे-मुंबई एक्सप्रेसमधील घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या रेल्वेत इगतपुरी येथे एका वृद्ध व्यक्तीला गोमांस असल्याच्या संशयावरून चार पाच तरुणांनी मारहाण केली होती, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. रेल्वे पोलिसांनी त्या तरुणांवर जुजबी कारवाई केल्याने त्यांची लगेच जामीनावर सुटका झाली. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कलमे लावून कारवाई करणे गरजेचे होते. अशा गुन्हेगारांना मोकाट सोडू नये, कायद्याची जरब बसली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असले प्रकार चालणार नाहीत, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.