भाजपबरोबर युतीचा ठराव, रिपाइंला महाराष्ट्रात हव्यात लोकसभेच्या दोन जागा !
Santosh Gaikwad
August 08, 2023 06:14 PM
नवी दिल्ली दि. ८ : नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणी ची बैठक संपन्न झाली. त्यात विविध ठराव मंजूर करण्यात आले. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करणार असल्याचा ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणी च्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून त्यापैकी दोन जागा रिपाइंला सोडण्यात याव्यात असाही ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीस काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभरातील २८ राज्य आणि ८ केंद्रीय शासित प्रदेशांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपला साथ देणार असून त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा देशात दिसणार आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती करण्याचा ठराव रिपाइंच्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्राप्रमाणे देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन क्रियाशील आहे. त्यामुळे देशभरात भाजपने रिपब्लिकन पक्षाला जागा वाटपात सोबत घ्यावे. ज्या राज्यात भाजप ची सत्ता आहे, तिथे रिपब्लिकन पक्षाला सत्तेत काही प्रमाणात सोबत घ्यावे. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या दोन जागा द्याव्यात आदी अनेक ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.
खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमातीसह इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करणारा कायदा करण्यात यावा. तसेच पदोन्नती मध्ये आरक्षणाचा कायदा संसदेत मंजूर करावा यासह भूमिहीनांना प्रत्येकी ५ एकर जमीन देण्यात यावी असे ठराव करण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत विद्रोही कवी गदर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे देशभरात २५ करोड सदस्य येत्या ६ महिन्यात करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर, कर्नाटक चे वेंकट स्वामी, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, दयाळ बहादूर, सुरेश बारशिंग, एम एस नंदा, विजयराजे ढमाल, राजस्थान मधून राधामोहन सैनी, ऍड.नितीन शर्मा, ऍड. बी के बर्वे, यावेळी महिला आघाडी तर्फे सीमाताई आठवले, अॅड आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, ब्रह्मानंद रेड्डी, परम शिवा नागेश्वर राव, रवी पसूला, विनोद निकाळजे, मिरझा मेहताब बेग, गोरख सिंग, ऍड.अभयाताई सोनवणे, सूर्यकांत वाघमारे, अनिल गांगुर्डे, ऍड. मंदार जोशी, राजू सूर्यवंशी; अजीज नबाब शेख; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.