राजभवनात टपाल पोचवर निर्बंध, सद्या केवळ 1 तास पोच दिली जाते
Santosh Gaikwad
20, 3-28 05:37 PM
मुंबई : राजभवनात टपाल पोचवर निर्बंध आणले असून केवळ दुपारी 3 ते 4 या 1 तासाच्या कालावधीत पोच दिली जाते. शासकीय कामकाजाच्या दिवसामध्ये कार्यालयीन वेळेत टपाल द्यावयाचे असल्यास टपाल पेटीत टाकण्याचा सल्ला वजा फलक राजभवनातील सुरक्षा कार्यालयात लावला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल रमेश बैस यांस 20 फेब्रुवारी 2024 रोजी लेखी पत्र पाठवून नागरिकांच्या व्यथा मांडल्या आहेत. गलगली यांनी पत्रात त्या फलकाचा उल्लेख करत नमूद केले आहे की शासकीय कामकाजाच्या दिवसामध्ये कार्यालयीन वेळेत टपाल द्यावयाचे असल्यास टपाल पेटीत टाकण्यात यावे. टपालाची पोच अपेक्षित असल्यास असे टपाल दुपारी 3:00 ते 4:00 या कालावधीत स्विकारुन टपालाची पोच देण्यात येईल.
गलगली यांच्या मते प्रत्येक पत्राला पोच आवश्यक असते आणि त्यास पेटीत टाकणे योग्य नाही. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यापूर्वी अशी पद्धत नव्हती. असे निर्बंध लावणे चुकीचे आहे. त्यांनी मागणी केली आहे की राजभवनात टपालाची पोच कार्यालयीन वेळेत देण्यात यावी. शक्य झाल्यास मुख्य प्रवेशद्वार येथे सर्वसामान्य टपाल आणि अन्य पत्रव्यवहार करण्यासाठी पोच व्यवस्था निर्माण करावी जेणेकरुन राजभवनात फक्त टपालाची पोच साठी कोणी प्रवेश करणार नाही.