रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल : सत्याचा विजय होणार - सुप्रियाताई सुळे
Santosh Gaikwad
January 24, 2024 03:50 PM
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर प्रसार माध्यमांची बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात येत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला. शरद पवार साहेब यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. खासदार सुप्रियाताई सुळे देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. तर, सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्यासोबत भारताचं संविधान हाती घेतलं होतं. रोहित पवार यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा उपस्थित होते. ईडी कार्यालयाबाहेर मोठी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे.
रोहित पवारने मोठी संघर्ष यात्रा काढील असून तो राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी, सोशित पीडित आणि वंचितांसाठी काही तरी करू पाहतोय. त्यामुळे कदाचित हे सूडाचे राजकारण असू शकते अशी भावना लोकांमध्ये आहे असे सुप्रियाताई सुळे म्हटल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, हे शक्ती प्रदर्शन नाही. सर्व गोष्टी या शक्तीने होत नाही. यात प्रेम आणि नातीही असतात. रोहित पवारांनी महाराष्ट्रातील युवापिढीसाठी कामे केली आहे. त्यामुळे रोहित पवारांबद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आस्थाही आहे. आपला हा भाऊ लढत असेल तर त्यासाठी येथे यावे यात गैर काय आहे? या देशात अजूनही लोकशाही आहे असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार -आमदार रोहित पवार
मी एवढंच सांगेन अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जी कागदपत्रे मागवली ती सगळी कागदपत्रं दिली आहेत. आज पुन्हा मला येथे चौकशीसाठी बोलावलं. तेथे जाऊन मी पुन्हा त्यांना माहिती देईन. अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करेन. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ते त्यांचं काम करतात. त्यांच्या मागे कुठला विचार, कुठली शक्ती आहे, याबाबत आज तरी सांगता येणार नाही. परंतु सामान्य लोकांसोबत चर्चा केल्यानंतर असं समजते की, सर्वसामान्यांचा आवाज महाशक्तीविरोधात उठवल्यानंतरच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे. आतापर्यंत जी माहिती मागवली आहे, ती सीआयडीला, ईडीलासुद्धा दिलेली आहे. परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी ईडी कार्यालयात जात आहे. तेथे अधिकाऱ्यांची चालती असेन असे रोहित पवार म्हणाले.