रिपाइं कोकण प्रांत अध्यक्षपदी प्रकाश मोरे तर कार्याध्यक्ष पदी राहुल डाळिंबकर यांची निवड
Santosh Gaikwad
February 22, 2024 05:51 PM
मुंबई / प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोकण प्रांत अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते प्रकाश मोरे तर कार्याध्यक्ष पदी राहुल डाळिंबकर यांची निवड जाहीर केली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार हि निवड करण्यात आली.
रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने आज गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ,आझाद मैदान येथे पत्रकार परिषदेची आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांनी कोकण प्रांतातील विविध पदे जाहिर केली. या पत्रकार परिषदेत मुंबई अध्यक्ष सिध्दार्थभाई कासारे, सुरेश बारसिंगे, रमाकांत जाधव, संजय पवार, प्रकाश जाधव, नरेंद्र गायकवाड, शिरीषभाई चिखलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे म्हणाले कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात रिपाइं पक्षसंघटना व्यापक स्वरूपात विस्तारत आहे. महाराष्ट्रासह कोकणात रिपब्लिकन पक्ष जिवंत ठेवण्यात तळागळातील कार्यकर्त्यांचं मोठं योगदान राहील आहे. मागील अनेक वर्षे प्रकाश मोरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सेवाभावी क्षेत्रात आपल्या कुशल कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. याबरोबरच आंबेडकर चळवळ वाढीसाठी योगदान दिले आहे. मोर्चे, धरणे आंदोलन आदींच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे.मोरे यांचे उत्तम संघटन कौशल्य व दांडगा जनसंपर्क याचा पक्ष वाढीसाठी लाभ होणार असून कोकण अध्यक्ष पदाला योग्य न्याय देतील असा विश्वास गौतमभाऊ सोनवणे यांनी आयोजित केला.