मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी तो वादात अडकला आहे. कुणाल कामराच्या या गाण्यानंतर त्याच्याविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शिवेसनेच्या (शिंदे) नेत्यांकडून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, यानंतर कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने अटपूर्व जामीन अर्ज मंजूर करत दिलासा दिला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला दोनवेळा चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. पण अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. असं असतानाच आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी कुणाल कामराला धमकीवजा इशारा दिला आहे. ‘कुणाल कामरा जेव्हा मुंबईत येईल तेव्हा त्याचे शिवसेना स्टाईलने स्वागत करु’, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
कुणाल कामराबाबत एएनआयशी बोलताना राहुल कनाल यांनी काय म्हटलं की, “कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे. मात्र, तो दिलासा ७ एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं”, असं राहुल कनाल यांनी म्हटलं.
“कुणाल कामराला तामिळनाडूमध्ये कितीही संरक्षण असलं तरी जेव्हा मुंबई येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू, ही धमकी नाही, तर आपल्याकडे अथिती देवो भवची संस्कृती आहे. घाबरण्याचं कारण नाही, कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला समोरं जावं”, राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.