सचिन वाझे च्या आरोपाने खळबळ, देशमुखांची फडणवीसांना ही विनंती

Santosh Gaikwad August 04, 2024 11:58 PM


मुंबई : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत” असा आरोप सचिन वाझे याने केला होता. त्यावर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विनंतीही केली आहे.

अनिल देशमुख म्हणाले,  “काल देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचा आधार घेत माझ्याविरोधात पुन्हा एकदा आरोप करण्यास सांगितले. सचिन वाझे हा एक दहशतवादी असून त्याच्यावर दहशतवादी कट रचल्याप्रकरणी आणि दोन खून केल्याचे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये आहे. अशा सचिन वाझेचा उपयोग देवेंद्र फडणवीसांना माझ्याविरोधात आरोप करण्यासाठी घ्यावा लागतो, ही खूप शरमेची बाब आहे”, असे अनिल देशमुख म्हणाले.

“सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन तीन वर्षांपूर्वी हेच आरोप केले होते, जे त्यांनी काल केले. त्यावेळी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की, माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करावी. मी विनंती केल्यानुसार, त्यावेळी सरकारने माझी चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती चांदिवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची ११ महिने चौकशी केली. यानंतर त्यांनी हा चौकशी अहवाल दोन वर्षांपूर्वी सरकारला दिलेला आहे. तो अहवाल सध्या गृहखात्याकडे आहे. मी याबद्दल वारंवार मागणी करत आहे की माझ्या चौकशीचा हा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा. तो अहवाल १४०० पानांचा आहे. मी वारंवार याबद्दल मागणी करत आहे. पण तरीही तो अहवाल राज्य सरकार जनतेसमोर आणत नाही”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे “आता मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, तुमच्या गृह विभागाकडे असलेला तो अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा”, असे अनिल देशमुखांनी म्हटले.